Friendship Day: शेतातला शिवज्या अन् सिनेमातल्या सयज्याची दोस्ती!, विमानवारी घडविली
By जगदीश कोष्टी | Updated: August 4, 2025 17:34 IST2025-08-04T17:33:29+5:302025-08-04T17:34:02+5:30
मित्र्याच्या हाकेला ओ देत शिवाजी पण गेला. विमानातून प्रवास घडविला.

Friendship Day: शेतातला शिवज्या अन् सिनेमातल्या सयज्याची दोस्ती!, विमानवारी घडविली
जगदीश कोष्टी
सातारा : लहानपण निरागस असतं. मित्र-मैत्रिणी सतत भांडतात अन् काही वेळानं एकत्र खेळायलाही लागतात. हे नातं कोणत्याही अपेक्षांच्या पलीकडं असतं; पण त्यातीलच एकजण मोठा झाला तर संपत्तीची बाधा होते अन् मैत्रीत अंतर पडायला लागतं. याला अपवाद ठरली अभिनेते सयाजी शिंदे आणि शिवाजी शिंदे यांची मैत्री. शिवज्या-सयज्याने साठ वर्षांपासून ही मैत्री जपली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे आणि शिवाजी शिंदे हे पहिलीपासून एकाच वर्गात. दोघांमध्ये शिवज्या हे सयज्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे; पण ते एकत्रच वाढले. शेतात काम करत होते; पण दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची असल्याने सयाजी सातवीनंतर फलटण तालुक्यातील हाडगुड येथे बहिणीकडे शिकायला गेले. तर शिवाजी मात्र तेथेच राहिले. कण्हेरमध्ये त्यांनीही दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. तेव्हाच्या काळात मोबाइल नव्हता; पण त्यांच्यातील मैत्री कायम होती.
शाळेला सुटी लागल्यावर गावच्या यात्रेला सयाजी गावी येत. यात्रेत होणाऱ्या नाटकातही ते एकत्र काम करत होते. सयाजी शिंदे हे सिनेक्षेत्रातील मोठं नाव आहे. हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटात ते काम करत असतात. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम सुरू असले तरी जुन्या मित्राला ते विसरलेले नाहीत.
विमानवारी घडविली
एकेदिवशी शिवाजी शेतात काम करत होते तेव्हा सयाजीचा फोन आला. सयाजी म्हणाले, ‘शिवज्या काय करतोयस रं. किती दिवस शेती करणार. चार कपडे घे अन् ये पुण्याला. आपण कोलकात्याला जाऊ.’ मित्र्याच्या हाकेला ओ देत शिवाजी पण गेला. अशा प्रकारे पंधरा दिवस फिरवले. विमानातून प्रवास घडविला. बदलत्या जगाचा अनुभव घडविला.
सिनेमा, रीलमधील हिरो
सयाजी शिंदे यांनी शिवज्याला अनेक ठिकाणी फिरवलं. चित्रीकरण दाखविलं. तसंच ‘उंटावरचा शहाणा’ या चित्रपटात छोटीशी भूमिकाही दिली. समाजमाध्यमावर शिवज्या-सयज्याचे अनेक रील आहेत. ते प्रचंड व्हायरल होत आहेत.
सयाजी कितीही मोठा झाला असला तरी आम्ही मनाने एकच आहोत. त्याला नाटक करताना एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर फोन करून विचारतो. तसंच मला बाहेर फिरवून जग पाहण्याची संधी मिळाली. - शिवाजी शिंदे, वेळेकामथी