गंभीर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

By Admin | Updated: September 14, 2016 00:46 IST2016-09-14T00:31:47+5:302016-09-14T00:46:11+5:30

पिंपोडे बुद्रुक : दुसऱ्याच्या परवान्यावर चालायची २० वर्षांपासून दुकानदारी

Action on bogus doctors with serious surgery | गंभीर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

गंभीर शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

वाठार स्टेशन : मूळव्याधीसारख्या गंभीर आजारावर गेल्या २० वर्षांपासून शस्त्रक्रिया करणाऱ्या पिंपोडे बुद्रुकमधील डी. व्ही. पिंपोडकर व एस. एस. मंडल या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध वाठार पोलिस ठाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. बीएएमएसची पदवी असताना हे शस्त्रक्रिया करीत होते.
वाई हत्याकांडातील संतोष पोळ प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत बंगालमधील बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. त्यांनी दुसऱ्याच डॉक्टरांच्या नावे परवाने काढले असून, संबंधित बोगस डॉक्टर अघोरी कृत्य करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, मूळव्याधीसारख्या आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी वाढल्याने वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एम. पी. रायबोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी पिंपोडे बुद्रुक येथील शुभम क्लिनिकमध्ये आरोग्य केंद्रातील परिचर रमाकांत माळी यांना रुग्ण म्हणून पाठविले. माळी यांची तपासणी करताना शासनाने नेमून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व नियमांचे पालन न केल्याचे निष्पन्न झाल्याने रायबोले यांनी डी. व्ही. पिंपोडकर व एस. एस. मंडल यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१ चे कलम ३३ व बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा १९४९ चे कलम ३ सह ६ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत वाठार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शासकीय रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर गेल्या २० वर्षांपासून हा उद्योग सुरू होता. तरीही आजवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. संतोष पोळ घटनेनंतर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बोगस डॉक्टरांबाबत कोणकोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागणार. दोन्ही बोगस डॉक्टरांवर काय कारवाई होणार याविषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. (वार्ताहर)


एकाच पदवीवर
दोघांचा दवाखाना
पिंपोडे बुद्रुकमधील डी. व्ही. पिंपोडकर याच्याकडे बीएएमएसची पदवी आहे. मात्र, या पदवीचे गेल्या पाच महिन्यांपासून नूतनीकरण केलेले नाही. तसेच या पदवीधारकाला केवळ आयुर्वेदिक औषधे देण्याचा अधिकार असून, शस्त्रक्रिया करता येत नाही. तरीही तो गंभीर शस्त्रक्रिया करीत असे, तसेच अ‍ॅलोपॅथिक औषधे देत होता. पिंपोडकर याच्या पदवीच्या आधारे एस. एस. मंडल शस्त्रक्रिया करीत होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉपॅथीची पदवी आहे. मात्र, या पदव्यांसंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आली.

Web Title: Action on bogus doctors with serious surgery