अपहरण करून विवाहितेवर अत्याचार
By Admin | Updated: July 19, 2015 23:38 IST2015-07-19T22:41:27+5:302015-07-19T23:38:00+5:30
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

अपहरण करून विवाहितेवर अत्याचार
कऱ्हाड : कोयना वसाहत येथून विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. राजेंद्र शिवाजी घारे, विणा पोसते (रा. बर्गेवस्ती, कऱ्हाड), सचिन चव्हाण, कल्पना चव्हाण (रा. भोळी, ता. भोर, जि. पुणे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्र घारे याने पीडित महिलेशी एका गुन्ह्याच्या प्रकरणात ओळख वाढवून या ओळखीचा गैरफायदा घेत कोयना वसाहत येथून तिचे अपहरण केले. त्यानंतर ३ जून २०१५ रोजी तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. तसेच तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन शिरवळ, ता. खंडाळा येथे नेले. तेथे काही दिवस ठेवून आंबवडे व भोळी येथेही तिच्यासमवेत वास्तव्य केले. या दरम्यानच्या काळात राजेंद्र घारे याने पीडित महिलेला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. यात महिलेचे अपहरण करण्यासाठी विणा पोसते हिने घारे याला मदत केली, तर आंबवडे व भोळे येथे वास्तव्यासाठी सचिन चव्हाण व कल्पना चव्हाण यांनी मदत केली, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राजेंद्र घारे याच्यासह सचिन चव्हाण, कल्पना चव्हाण, विणा पोसते यांच्यावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)