फरार आरोपीस चौदा वर्षांनी अटक
By Admin | Updated: January 20, 2015 00:03 IST2015-01-19T22:14:54+5:302015-01-20T00:03:23+5:30
पाटण पोलीस गुजरातला : खूनप्रकरणी झाली होती जन्मठेपेची शिक्षा

फरार आरोपीस चौदा वर्षांनी अटक
कऱ्हाड : जन्मठेपेची शिक्षा भोगताना पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. तब्बल चौदा वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये पलायन केलेल्या त्या फरार आरोपीस रविवारी पाटण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आनंदा लक्ष्मण चोपडे (रा. डावरी, ता. पाटण) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा चोपडे याच्यासह अन्य काहीजणांनी १९९६ मध्ये जमिनीच्या वादातून आत्माराम सावळा चोपडे यांचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आनंदा चोपडे याला १९९९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १९९९ ते २००२ पर्यंत आनंदा चोपडे कारागृहात होता. २००२ मध्ये तो पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला. मात्र, पॅरोल संपूनही तो परत कारागृहात गेला नाही. पोलिसांनी शोध घेतला असता तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. गत चौदा वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, फरार आरोपी आनंदा चोपडे हा सुरत-गुजरातमध्ये सचिनगाव नावाच्या गावात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास धस यांना मिळाली. निरीक्षक धस यांनी याबाबत पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे यांच्याशी चर्चा करून कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश गर्जे, पाटणचे हवालदार सुनील महाडिक, नाईक प्रवीण कोळी यांच्यासह पोलीस पथक गुजरातला पाठविले. पोलीस पथकाने रात्री आनंदा चोपडेला ताब्यात घेऊन अटक
केली. (प्रतिनिधी)
भांड्यांना कल्हई देण्याचा व्यवसाय
कारागृहातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आनंदा चोपडे याने काही दिवसांतच पत्नीसह गुजरातला पलायन केले होते. गुजरातमधील सचिनगावमध्ये एका भाडेतत्त्वावरील खोलीत हे पती-पत्नी वास्तव्यास होते. गत अनेक वर्षांपासून त्याठिकाणी हे दाम्पत्य भांड्यांना कल्हई देण्याचा व्यवसाय करीत होते, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.