पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे क्लासमध्ये अभ्यास करत असताना तरुणीचा एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला करून खून केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेप आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.पोलिसांच्या माहितीनुसार, ६ मार्च २०२२ रोजी सकाळी सवा नऊच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक येथील एका क्लासमध्ये एक १७ वर्षांची तरुणी अभ्यास करत होती. त्यावेळी आरोपी निखिल राजेंद्र कुंभार (वय २६, रा. पिंपोडे बुद्रुक) याने एकतर्फी प्रेमातून हातातील चाकूने तरुणीच्या पोटात तसेच पायावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात धनंजय भीमराव लेंभे (रा. पिंपोडे बुद्रुक) यांनी तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
वाठार स्टेशन ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. बोंबले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयात लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी आरोपी निखिल कुंभार याला गुन्ह्यात जन्मठेप तसेच ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. या खटल्यात १३ साक्षीदार तपासण्यात आले. कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने विशेष परिश्रम घेतले तर पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फाैजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, हवालदार गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते आदींनी सहकार्य केले.