सातारा जिल्ह्यातील शहाबाग होणार हळदीचं गाव !, कृषी संचालकांकडे प्रस्ताव
By नितीन काळेल | Updated: January 2, 2025 19:11 IST2025-01-02T19:10:57+5:302025-01-02T19:11:10+5:30
हळद पदार्थांचा ब्रँड तयार होणार, शहाबागच का?

सातारा जिल्ह्यातील शहाबाग होणार हळदीचं गाव !, कृषी संचालकांकडे प्रस्ताव
नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्ह्यात विविध प्रकारची गावे विकसित होत असून वाई तालुक्यातील शहाबागचा हळदीचे गाव म्हणून विकासासाठीचा तांत्रिक प्रस्ताव कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहाबागचा हळद ब्रँड तयार होईल. तसेच यामुळे पर्यटन वाढून पर्यटकांसाठी निवास व्यवस्थाही होईल. लोकांनाही हळदीपासून तयार पदार्थांची खरेदी करता येणार आहे.
सातारा जिल्ह्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. फळांचं गाव म्हणून धुमाळवाडी पुढे आली आहे. तसेच आता हळदीचं गाव म्हणून शहाबागवर मोहोर उमटणार आहे. शहाबाग हळदीचं गाव म्हणून विकसित करण्यासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो राज्य कृषी विभागाने तांत्रिक मंजुरीसाठी कृषी संचालकांकडे पाठवला. यामुळे शहाबागमध्येच हळदच्या पानापासून तेल उत्पादन होईल. साैंदर्य प्रसाधनात हळदचा वापर वाढेल. गोल्डन मिल्क पावडरची निर्मिती होईल. तसेच हळदपासून उपपदार्थांची निर्मिती होणार आहे.
विशेष म्हणजे पर्यटक हळदपासून तयार पदार्थ जसे हळद पावडर, फ्लेक्स, तेल, साबण, शॅम्पू, उटणे, गोल्डन मिल्क आदी खरेदी करतील. यामुळे अर्थकारण वाढीस ही मदत होईल, असा हेतू यामागे आहे. सातारा जिल्ह्यात हळद क्षेत्र सुमारे १,५०० हेक्टर असून वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यात याचे प्रमुख क्षेत्र आहे.
शहाबागच का?
शहाबागमध्ये सुमारे १०० हेक्टरवर हळद पीक घेतले जाते. हे गाव पुणे-वाई-महाबळेश्वर मार्गावर आहे. याच रस्त्याने पर्यटक जातात. त्यातच शहाबागमध्ये हळद पावडर करण्याचे तीन मोठे उद्योग आहेत. त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल या हेतूने शहाबाग गावाने हळदीचे गाव जाहीर करण्याबाबत कृषी विभागाकडे प्रस्ताव दिला होता.
शहाबागचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यापूर्वी तांत्रिक मंजुरीसाठी कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाप्रमाणे काम झाल्यास शहाबागचा हळदच्या पर्यटनाचे गाव म्हणून विकास होईल. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी