फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे गांजा तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला तस्करांनी एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यामध्ये पोलिस अधिकारी गोपाळ बदने जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सुरवडी-साखरवाडी मार्गावर घडली.आंबेडकर जयंतीनिमित्त सुरक्षेसाठी तैनात फलटण ग्रामीण पोलिसांचा तपासणी नाका केला होता. सात सर्कल रोडवरील एका शेतात एक कार आली. तिला बदने यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती धडकून थांबली. चालकाकडे चौकशी करत असतानाच चालकाने अचानक खिडकीची काच वर घेतली. यात बदने यांचा हात अडकला. तशीच कार पळवत नेली. सुमारे एक किलोमीटरपर्यंत बदने यांना फरफटत नेले. त्यानंतर कार शेतात जाऊन उभी राहिली. कारचालक पळून गेला.शेजारी बसलेले व्यक्ती स्थूल असल्याने पळाला नाही. नंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी तेथे पोहोचले. त्यावेळी कारमध्ये पांढऱ्या गोणीत दहा किलो ३० ग्रॅम गांजा आढळून आला. कारमधून पकडलेल्या व्यक्तीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने लक्ष्मण रामू जाधव (वय ६०, रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर), अशी माहिती दिली व पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव रणजित लक्ष्मण जाधव असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीवर यापूर्वी म्हसवड, लोणंद, माळशिरस या ठिकाणी गांजा वाहतूकप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीच्या खुब्याचे हाड मोडलेपोलिस अधिकाऱ्याला फरफटत नेल्यानंतर कार धडकून पडली. यावेळी लक्ष्मण याच्या खुब्याचे हाड मोडले. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर पोलिस अधिकारी बदने यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.