सातारा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व त्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १८ मे रोजी सुरूर ता. वाई येथे घडली असून, याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जक्कल रंगा काळे, संगीता ऊर्फ टिमकी जक्कल काळे, सोनू जक्कल काळे, मक्शा रंगा काळे (सर्व रा. सुरूर, ता. वाई, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरूर गावच्या हद्दीतील माळावरच्या झोपडपट्टीमध्ये १८ मे रोजी वरील संशयितांनी अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या अनोळखी व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २३ रोजी सायंकाळी सहा वाजता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. भुईंज पोलिसांनी तपास केल्यानंतर हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. परंतु त्या व्यक्तीची ओळख पटली नसून, पोलिस त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात दगड घालून खून, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:33 IST