Satara: अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा शिवारात आढळला, वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू
By संजय पाटील | Updated: March 2, 2024 13:48 IST2024-03-02T13:45:38+5:302024-03-02T13:48:43+5:30
कऱ्हाड : तळबीड, ता. कऱ्हाड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात ...

Satara: अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा शिवारात आढळला, वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू
कऱ्हाड : तळबीड, ता. कऱ्हाड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात उसाच्या शेतामध्ये आज, शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा शेतकऱ्यांना दिसला. या बछड्याला चालता येत नव्हते. शेतकऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभाग आणि रेस्क्यू टीमला दिली. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे पथक त्याठिकाणी पोहोचले.
पथकाने बछड्याला ताब्यात घेतले. तसेच तातडीने त्याला पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बछड्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित बछडा आजारी असून अनेक दिवसांपासून तो उपाशी असावा, असा वनविभागाचा कयास आहे. हा बछडा मादी जातीचा असून सुमारे तीन महिने वयाचा आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.