साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
By दत्ता यादव | Updated: November 26, 2022 15:32 IST2022-11-26T15:31:58+5:302022-11-26T15:32:22+5:30
गवा पाण्याच्या शोधात विहिरीजवळ आला असण्याचा अंदाज

साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
सातारा : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठाराजवळील पिसाणी (ता. सातारा) गावाच्या हद्दीतील विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजता समोर आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिसाणी गावातील नामदेव गोगावले यांची पिसाणी गावाजवळच्या शेतात विहीर आहे. ते शेताला पाणी देण्यासाठी गिरणोळी शिवारात गेले होते. त्यावेळी विहिरीत गवा मृत अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती सरपंच लक्ष्मण गोगावले यांना दिली. त्यानंतर वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली. हा गवा पाण्याच्या शोधात विहिरीजवळ आला असावा, त्याचा तोल जाऊन गवा विहिरीत पडला असावा, अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी गव्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेले आहेत. पण ते कमी पडत असल्याने वन्यप्राणी पिण्याचे पाणी व अन्नाच्या शोधात गावाच्या जवळ येत आहेत. त्यांना अंदाज न आल्याने त्यांचा असा अपघाती मृत्यू होत असल्याचे इथल्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे.