कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडीमध्ये जुने भांडण, प्रेमविवाह व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे जोरदार हाणामारी झाली. यामध्ये काहीजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाटमवाडीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.भाटमवाडी येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका गटाने एकत्रित येऊन अनिकेत यादव याला लोखंडी कोयता, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. त्याचबरोबर सोमनाथ यादव, सनी संजय यादव हे देखील त्यामध्ये जखमी झाले आहेत. याप्रकरणी अनिकेत यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आठजणांनी एकत्रित येऊन शुभम पवार व आकाश जाधव यांना लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी शुभम पवार यांनी फिर्याद दिली असून, आठजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार का दिली याचा राग मनात धरून दहाजणांनी भाटमवाडी गावच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरजवळ दगड घेऊन कोयते व तलवारी नाचवत कारवर दगडफेक केली. त्याचबरोबर घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. घराच्या दारासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींवर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी मच्छिंद्र नारायण जाधव यांनी फिर्याद दिली असून, दहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. या तीनही गुन्ह्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक जगदाळे व शेडगे हे करीत आहेत.
Satara: प्रेमविवाह अन् पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून भाटमवाडीत दोन गटांत राडा, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:10 IST