मुराद पटेल शिरवळ: सहा वर्षीय पोटच्या गोळ्याला हाताने व काठीने गंभीररित्या मारहाण करीत गंभीर जखमी केलेल्या नराधम आईसह बापाला शिरवळ पोलिसांनी दणका दिला. या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता दत्ताञय चव्हाण व दत्ताञय रामचंद्र चव्हाण (रा. दत्तनगर, शिरवळ ता. खंडाळा, मूळ रा. भादे ता. खंडाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या आई-वडिलांचे नाव आहे.याप्रकरणी लोकमत'ने वस्तूनिष्ठ बातमी देत आवाज उठवला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संबंधित आई-वडिल हे लहानग्याला दारु सारखे मादक पदार्थाचे सेवन करण्यासही लावत असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.शिरवळ पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मूळ रा.भादे ता.खंडाळा सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा येथील सविता चव्हाण ह्या 31 ऑगस्ट रोजी शिरवळ येथील खाजगी रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ञ डाँ.सुदर्शन गोरे यांच्याकडे आपला सहा वर्षीय लहानग्याला अपघाताचा बनाव करीत उपचाराकरीता घेऊन आल्या होत्या. दरम्यान,डाँ.सुदर्शन गोरे यांना संशय आल्याने याबाबतची माहिती तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी तातडीने दवाखान्यात धाव घेतली असता आई सविता चव्हाण व संबंधित मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिली.यावेळी वडिल दत्ताञय चव्हाण यानेही कसलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी तातडीने 3 सप्टेंबर रोजी व 5 सप्टेंबर रोजी बालकल्याण समिती अध्यक्ष अँड.डाँ.सुचिञा घोगरे-काटकर यांच्या समोर उभे केले असता व सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये वैदयकीय तपासणी केली. यात लहानग्याचे दोन्ही हात फ्रँक्चर व 13 गंभीर जखमा व पायाला चटके दिल्याने व मारहाणीमुळे झाल्याचे निदर्शनास आले. असल्याचे डाँकटरांनी तसा अहवाल सातारा येथिल बालकल्याण समितीला सादर केला. त्यानुसार बालकल्याण समितीने संबंधित दोन्ही मुले म्हसवड येथील शिशुगृहामध्ये ठेवण्याचे आदेश शिरवळ पोलीसांना दिले.यावेळी बालकल्याण समितीने याबाबतचा अर्ज व चौकशी अहवाल सातारा येथील बाल न्याय मंडळ यांच्याकडे दाखल करीत लहानग्याकडे केलेल्या चौकशीनुसार हा प्रकार समोर आला. याबाबतची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत.
पोटच्या चिमुकल्याला मारहाण करीत केले जखमी, नराधम आई-बापावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 16:55 IST