Satara: कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास

By संजय पाटील | Updated: December 21, 2024 17:27 IST2024-12-21T17:26:28+5:302024-12-21T17:27:13+5:30

अभ्यासकांकडून गणना : स्थानिक पक्ष्यांचे थवे, स्थलांतरितांच्या जोड्याही आढळल्या

82 species of birds are found along the banks of the Krishna River in Karad Satara | Satara: कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास

Satara: कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास

संजय पाटील

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर नोंदले गेले आहेत.

कऱ्हाड परिसराला मुबलक जैवविविधता लाभली आहे आणि याच जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करून डॉ. सुधीर कुंभार यांच्यासह त्यांच्या टीमने नोंदी केल्या आहेत. कऱ्हाडजवळ कृष्णा नदीवरील खोडशी धरण परिसर, प्रीतिसंगम बाग, विद्यानगर, कृष्णा पूल, वाखाण परिसर, टेंभू प्रकल्प येथे हे निरीक्षण व नोंदी केल्या आहेत.

निरीक्षणाबाबत डॉ. सुधीर कुंभार यांनी सांगितले की, कऱ्हाड परिसरात मोर, लांडोर, पाणकावळे, पाकोळ्या, सूर्यपक्षी व सुगरण या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच सुगरणींच्या घरट्यांची संख्याही वाढली आहे. वेडाराघू, लाल मैना, वटवट्या, ट्रायकलर, सुभग, हळद्या, मिनीवेट, तांबट, पिंगळे, गव्हाणी घुबड यांचीही नोंद झाली आहे.

सत्तरहून अधिक घारी..

कऱ्हाड परिसरात पक्षी निरीक्षकांना सत्तरहून अधिक नागरी घारी दिसल्या आहेत. उंच झाडांवर या घारींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.

निरीक्षकांनी नोंदवलेले पक्षी (कंसात संख्या)

रंगीत करकोचे (२२), पांढऱ्या मानेचे करकोचे (१२), पांढरा अवाक (२०), काळा शराटी (२१), नदी सुरय (२८), स्पून बिल (१८), पिवळा, पांढरा, राखाडी धोबी (५३), शेकाटी (६), चक्रवाक (८), किंगफिशर (११), नीलकंठ (८), हळदीकुंकू बदक (१०३), ब्राह्मणी घार (७), शिक्रा (३), कापशी घार (२), ससाणा (१), जंगल मैना (१२०).

एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळे

नव्या कृष्णा पुलानजीक एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळे निरीक्षकांना आढळले. नाइट हेरॉन, जांभळे व राखी बगळे परिसरात आहेत. पांढऱ्या पोटाच्या पाणकोंबड्या, जांभळ्या पाणकोंबड्या, छोटे कार्मोरंट, राखी धनेश, पाणटिटव्याही खोडशी ते वाखाणपर्यंतच्या नदीकाठावर असल्याचे अभ्यासक राजेंद्र कदम यांनी सांगितले.

Web Title: 82 species of birds are found along the banks of the Krishna River in Karad Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.