7 villages in Satara district still have tanker water ... | अर्धा पावसाळा संपला तरी झळ; दीड लाखावर ग्रामस्थ पाणी टंचाईच्या फेऱ्यात
अर्धा पावसाळा संपला तरी झळ; दीड लाखावर ग्रामस्थ पाणी टंचाईच्या फेऱ्यात

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १०० गावांना अजूनही टँकरने पाणी...

सातारा : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी अजूनही दुष्काळी भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आजही दीड लाखावर नागरिक आणि ८२ हजार पशुधन १२१ टँकरवर अवलंबून आहेत. टंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्याला बसत आहे. माणमधील ७६ गावे आणि ५७४ वाड्यांना अजनूही टँकरचाच आधार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पूर्व भागात सुरुवातीला कमी पाऊस झाला. तर त्यानंतर परतीचा पाऊसही पडला नाही. पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. तसेच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न समोर आलेला. त्यामुळे राज्य शासनालाही दुष्काळ जाहीर करावा लागलेला. नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मात्र जानेवारी महिन्यानंतर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.
सध्या तर पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. तरीही पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे पावसाने उघडीप दिलेली आहे. पूर्वेकडे सुरुवातीला पाऊस झाला; पण तो टंचाई दूर करणारा ठरला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या काही केल्या मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही. सध्या जिल्ह्यात १०० गावे आणि ६९३ वाड्यांतील १ लाख ६८ हजार ५२१ लोकांना आणि ८२ हजार १०२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. त्यासाठी १२१ टँकर सुरू असून, त्याला २५७ खेपा मंजूर झालेल्या आहेत.

दुष्काळाची तीव्रता अजूनही माण तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील ७६ गावे आणि ५७४ वाड्या तहानलेल्या आहेत. त्यासाठी १०२ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्यात तुलनेत एक टँकर कमी झालाय. तालुक्यातील १ लाख ४० हजार २२३ नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. तर खटाव तालुक्यातील १८ गावे आणि ८३ वाड्यांसाठी १३ टँकर सुरू आहेत. या माध्यमातून १४ हजारांवर लोकांना पाणी देण्यात येते. कोरेगाव तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. सातारा, महाबळेश्वर, क-हाड, पाटण या तालुक्यांतील ही टँकर पहिल्या पावसानंतरच बंद झाले आहेत.


फलटणमध्येही सहा टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात सध्या माण, खटाव फलटण याच तालुक्यांत टँकर सुरू आहेत. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. फलटण तालुक्यातील ६ गावांना आणि ३६ वाड्यांना टंचाईची झळ अजूनही बसत आहे. त्यासाठी सहा टँकर सुरू आहेत. तालुक्यातील १३ हजार ६३१ नागरिक आणि ६ हजार २३४ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. आता पावसाळ्याचा दीड महिनाच बाकी आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला तरच दुष्काळी तालुक्यातील टँकर हटणार आहेत, अन्यथा भयंकर स्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.


Web Title: 7 villages in Satara district still have tanker water ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.