मुलाकडून रिक्षा शिकली, कराडमधील ६५ वर्षीय आजी सुसाट सुटली
By प्रमोद सुकरे | Updated: April 23, 2025 16:15 IST2025-04-23T16:14:31+5:302025-04-23T16:15:36+5:30
महिन्यात शिकल्या रिक्षा

मुलाकडून रिक्षा शिकली, कराडमधील ६५ वर्षीय आजी सुसाट सुटली
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: खरंतर वयाची पन्नाशी ओलांडली की अलीकडे लोकं थकल्यासारखे करतात. मग ६५ वय म्हणजे तर सेवानिवृत्ती नंतरचे वय मानले जाते. पण या वयातही न थकता एक आजी चक्क रिक्षा चालवायला शिकल्या आहेत. अन् गेल्या महिनाभरापासून त्या कराडात प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यांच्या या करारीपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
कराड तालुक्यातील नांदगाव हे एक छोटेसे गाव. येथील मंगल आवळे सध्या रिक्षा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पती मुले लहान असतानाच या जगातून निघून गेले. तेव्हा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ३ मुली, एक मुलगा यांचा सांभाळ केला. आता मुलगा मोठा होवून एस टी मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतोय. मुलींचीही लग्ने झाली आहेत. मुलाचा संसारही चौकोनी झाला आहे. त्या मुलाच्या संसाराला आपला हातभार लागावा. आपला बोजा कोणावर पडू नये या हेतूने त्यांनी काहीतरी करण्याचे निश्चित केले. त्यातून रिक्षा शिकून ती चालवण्याचा निर्णय घेतला. त्याला आता मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
वास्तविक दू चाकी असो वा चार चाकी असो ती चालवताना महिलांना कसरत करावी लागताना पहायला मिळते. काही महिला सरावाने सराईतपणे वाहने चालवतात पण तरीही मनात धाकधूक असतेच. मात्र नांदगाव येथील ६५ वर्षीय या आजींच्या चेहर्यावर कोणतीही भिती, धाकधूक दिसत नाही. उलट कराड शहरातील गर्दीतूनही त्यांची रिक्षा बुंगाट धावताना पहायला मिळते. या आजीची रिक्षा धावताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत.
मुलाने शिकवली आईला रिक्षा ..
खरंतर आई हा प्रत्येक मुलाचा पहिला गुरु असतो. तिच्याकडूनच आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. तसेच आई मंगल कडून घनःश्याम देखील सगळे शिकला. पण ६५ वर्षीय आई मुलगा घनःश्याम कडून रिक्षा शिकली आहे. स्वता एक ड्रायव्हर असलेल्या या मुलाने आईला नांदगाव परिसरात रिक्षा चालवण्याचे धडे दिले. आता ती सराईतपणे प्रवासी रिक्षा चालवू लागली आहे. त्यामुळे आईबरोबर मुलाचेही कौतुक होत आहे.
महिन्यात शिकल्या रिक्षा
मंगल आवळे यांचे सध्या वय ६५ आहे. त्याबरोबर त्यांना शुगरचा त्रासही आहे. तरी देखील महिनाभरात सरावाने त्या रिक्षा चालवायला शिकल्या आहेत. त्यांना चेष्मा मात्र लागलेला नाही. कराड मधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो. मात्र असे असतानाही मंगल आबा आवळे अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाचे कौतुक झाले नाही तर नवलच.
कराड -उंडाळे या मार्गावर मी प्रवासी वाहतूक करते. माझ्या रिक्षात प्रवाशीही बिनधास्त बसतात. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत रिक्षा चालवते. गरजेनुसार दुपारची विश्रांती ही घेते. तरीदेखील खर्च वजा जाता दररोज ५००ते ७०० रुपये मला मिळतात. तसेच शिकण्याची जिद्द असेल तर वयाची अडचण येत नाही. अन मुली, महिलांनी ठरवले तर त्या कोणत्याही क्षेत्रात कामे राहणार नाहीत. - मंगल आवळे, रिक्षा चालक
सुरुवातीपासून कष्टात आयुष्य घालवलेल्या आमच्या आईची या वयात देखील शिकण्याची व काम करण्याची उमेद आहे. म्हणूनच तीने रिक्षा चालवायला शिकले. आता प्रवासी वाहतूक ती करते त्यातून तिला मिळत असलेला आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटते. - घनश्याम आवळे, मुलगा