सहा महिन्यांत ६४६ ‘एचआयव्ही’ संसर्गित
By Admin | Updated: July 21, 2014 23:09 IST2014-07-21T23:03:42+5:302014-07-21T23:09:09+5:30
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण : गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले

सहा महिन्यांत ६४६ ‘एचआयव्ही’ संसर्गित
मोहन मस्कर-पाटील - सातारा
सातारा जिल्ह्यात ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांचे प्रमाण काही प्रमाणात घटले असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या सहा महिन्यांत म्हणजे, जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत जिल्ह्यात ६५ हजार ४७ व्यक्तींची ‘एचआयव्ही’ तपासणी करण्यात आली, त्यापैकी ६४६ व्यक्ती ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गित आहेत. संसर्गितांची घटती संख्या सातारा जिल्ह्यासाठी आशादायी चित्र असले तरी संसर्गितांची संख्या आणखी कमी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीने आणखी सकारात्मक पावले उचलली आहेत.
‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांना उपचार देणारे ‘एमसॅक’चे ‘एआरटी’ केंद्र सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आहे. फलटण आणि कऱ्हाडला ‘एआरटी’ केंद्र आहे. या तीनही केंद्रांतील २००४ पासून जून २०१४ ची आकडेवारी लक्षात घेता येथे १५,९०८ संसर्गितांची माहिती संकलित आहे. ‘एचआयव्ही’विषयी जनजागृती झाल्यानंतर साहजिक संसर्गितांच्या संख्येत वाढ झाल्याचे २०१३ पर्यंत लक्षात येते.
मात्र, गेल्या काही वर्षांत संसर्गितांमध्ये वाढ झाली असली तरी संसर्गितांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होऊन त्यांच्या आर्युमानात वाढ झाली आहे. त्यापाठीमागे ‘जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण’ विभागाचे मोलाचे योगदान आहे. या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून या कालावधीत झालेल्या नोंदी लक्षात घेता ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांची संख्या कमी झाली आहे.
कऱ्हाड, सातारा आणि फलटण येथे ‘एआरटी’ सेंटर सुरू करण्यात आली असली तरी त्याच्या जोडीला आता अकरा ‘लिंक एआरटी सेंटर’ सुरू केली आहेत. जिल्ह्यात कोरेगाव, दहिवडी, वडूज, गोंदवले, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा, पाटण, ढेबेवाडी, उंडाळे येथे ही केंद्रे असल्यामुळे या केंद्रांतून ‘एचआयव्ही-एड्स’ संसगिर्तांना औषधपुरवठा केला जात आहे. याच ठिकाणी अनेकदा संसर्गितांचे समुपदेशनही केले जाते.
विशेष म्हणजे, एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत आयसीटीसी केंद्रात सर्वसाधारण रुग्णांपैकी ‘एचआयव्ही-एड्स’ बाधित आढळून आलेल्या ३६५ रुग्णांपैकी २६६ रुग्ण औषधोपचारासाठी ‘एआरटी’ सेंटरला जोडले गेले आहेत.
जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांतील एचआयव्ही-एड्स संसर्गित
सालसर्वसाधारणगभर्वतीएकूण
२00४४६९८0५४९
२00५५४६११४६६0
२00६४९४९७५९१
२00७१५९११0९१७00
२00८२२६१९0२३५१
२00९२१२८९९२२२७
२0१0२१९४९२२२८0
२0११२0५२८६२१३८
२0१२१८८३४२१९२५
२0१३१६६0३७१६९७
२0१४६३0१६६४६
एकूण१५९0८८६२१६७७0
१७८ जणांना क्षयरोग...!
सातारा जिल्ह्यात क्षयरोगी रुग्णांची संख्याही वाढत आहेत. ‘आयसीटीसी’ सेंटरला जे येतात त्यांच्याही विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. येथे तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी २,३९२ संशयितांना क्षयरोग (टीबी) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७८ जणांना क्षयरोग झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर आता ‘डॉट्स’ उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात यावर्षी २,४६५ संशयित रुग्णांची गुप्तरोग व जननेंद्रियाच्या रोगांची तपासणी झाल्यानंतर त्यापैकी चार रुग्णांना ‘सिफीलीस’ झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीने केलेल्या प्रयत्नामुळे ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांची संख्या कमी होत आहे. ही बाब आशादायी आहे. तीन एआरटी सेंटर आणि अकरा एआरटी लिंक सेंटरचा चांगला फायदा संसर्गितांना होऊ लागला आहे. हे प्रमाण आणखी कमी कसे होईल, यावर आमचा भर राहणार आहे. संसर्गितांचे समुपदेशनही करण्यावर आमचा भर आहे.
- हेमंत भोसले,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डॉपक्यू
१६ गर्भवतींना एचआयव्ही संसर्ग
जिल्ह्यात जूनअखेर ६५,०४७ व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये ३१,९८४ गर्भवती महिलांचा समावेश होता. ज्या गर्भवती महिलांची तपासणी झाली, त्यापैकी १६ एचआयव्ही संसर्गित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत ८६२ ‘एचआयव्ही’ संसर्गित गर्भवती माता आढळल्या आहेत. यापैकी पाच वर्षांचा आढावा लक्षात घेता ३८० संसर्गित गर्भवती मातांपैकी ३६६ मातांच्या पोटी निरोगी तर १४ मातांच्या पोटी संसर्गित बालके जन्मली.