वीजबिलातून कायमची सुटका; साताऱ्यातील पाच हजार घरांमध्ये घडलीय ‘सौर’क्रांती!, महिन्याला किती लाख युनिट होते वीज निर्मिती.. वाचा
By सचिन काकडे | Updated: September 12, 2025 18:49 IST2025-09-12T18:49:06+5:302025-09-12T18:49:29+5:30
सूर्यघर योजनेची किमया : महिन्याला ११ लाख ५० हजार युनिट वीज निर्मिती

वीजबिलातून कायमची सुटका; साताऱ्यातील पाच हजार घरांमध्ये घडलीय ‘सौर’क्रांती!, महिन्याला किती लाख युनिट होते वीज निर्मिती.. वाचा
सचिन काकडे
सातारा : विजेच्या वाढत्या बिलांनी मेटाकुटीला आलेल्या साताऱ्यातील ५ हजार २६ कुटुंबांच्या घरात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेने ‘सूर्य’क्रांती घडवून आणली आहे. या योजनेमुळे घराच्या छतावर ‘सोलर रूफटॉप’ यंत्रणा बसवून हे नागरिक स्वत:च स्वतःची वीज तयार करत आहेत, ज्यामुळे त्यांचे मासिक वीजबिल कायमचे शून्य झाले आहे. या कुटुंबांची एकूण स्थापित वीज क्षमता १६.५ मेगावॅट इतकी आहे.
वीजबिलातून कायमची सुटका
ज्या घरांमध्ये महिन्याला हजारो रुपये वीजबिल येत होते, त्याच घरांमध्ये आता महिन्याला सरासरी ११ लाख ५० हजार युनिट सौर वीज तयार होत आहे. या ग्राहकांनी त्यांच्या वीज वापराची चिंता कायमची मिटवली आहे. स्वतःची वीज वापरून उरलेली वीज ते महावितरणला विकता येते व गरज भासेल तेव्हा महावितरणकडून मोफत घेताही येते.
नेमकी काय आहे ही योजना?
सूर्यघर मोफत वीज योजना हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्या अंतर्गत देशातील घरगुती ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप पॅनेल बसवण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. तसेच प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदानही दिले जाते. ही योजना प्रामुख्याने सर्वसामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. ज्याला विजेच्या बिलातून कायमची सुटका हवी आहे, तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत कोणत्याही वर्गासाठी किंवा आर्थिक गटासाठी कोणतीही मर्यादा नाही. शहरी किंवा ग्रामीण भागातील कोणताही ग्राहक या योजनेसाठी पात्र आहे.
सौर प्रकल्प बसविलेले ग्राहक तालुकानिहाय
- सातारा : २०००
- कराड : १४८२
- फलटण : ७७७
- वडूज : ४१४
- वाई : ३५१
क्षमतेनुसार असे मिळते अनुदान
किलोवॅट - रक्कम
- १ - ३० हजार
- २ - ६० हजार
- ३ - ७८ हजार
असे होताहेत फायदे
वीजबिलातून कायमची मुक्ती : एकदा ही यंत्रणा बसवल्यानंतर, वीज निर्मिती सुरू होते. वीजबिल शून्यावर येते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला सरासरी १०२ युनीट वीज तयार होते.
विजेच्या बदल्यात वीज : गरजेपेक्षा जास्त वीज तयार झालेली वीज नेट मीटररिंगद्वारे महावितरणला विकता येते. तसेच गरजेनुसार महावितरण कडून मोफत वीज घेता येते.
पर्यावरणाची काळजी : अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून वीज निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि प्रदूषण कमी होते.
असे होते वीजबिल शून्य
जर का एखाद्या ग्राहकाचा वीजवापर मासिक २०० यूनिट आहे. घरगुती दराप्रमाणे त्या ग्राहकाला स्थिर आकार, वीज आकार, वहन शुल्क असे सर्व प्रकारचे कर मिळून प्रति युनीट ११ रुपये १० पैसे प्रमाणे मासिक २ हजार २०० रुपये बिल येत असेल तर त्या ग्राहकाची वार्षिक २६ हजार ६४० रुपयांची बचत होते.