सातारा पालिकेकडून ४६६ कोटींचा अर्थसंकल्प सादर, मिळकतदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय
By सचिन काकडे | Updated: February 28, 2023 16:05 IST2023-02-28T16:05:17+5:302023-02-28T16:05:40+5:30
सातारा : भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४६६ कोटी ३३ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत ...

सातारा पालिकेकडून ४६६ कोटींचा अर्थसंकल्प सादर, मिळकतदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय
सातारा : भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४६६ कोटी ३३ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात हद्दवाढ भागातील पायाभूत सेवांसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून, पर्यावरणपूरक इमारतीच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना घरपट्टीत २० टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गोडोली, विलासपूर, खेड, शाहूपुरी, दरे या भागांतील रस्ते, गटारे, उद्याने, वीज या पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी, गोडोली तळे व कास धरणाच्या नवीन जलवाहिनीसाठी ५८ कोटींची तरतूद करण्यात आली.
ऊर्जा बचत, वृक्षारोपण, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना घरपट्टीत २० टक्के सवलत दिली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतसातारा पालिकेने १ हजार ९५८ घरांचा प्रकल्प हाती घेतला असून, बेघर व्यक्तींना सात लाख रुपयांत हक्काचे घर देण्यात येणार आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत ३ लाख ८८ हजार ३०० रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च यांचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला बरीच कसरत करावी लागली आहे. पालिकेच्या विकासकामांचा डोलारा शासकीय अनुदानावर उभा असून, यंदा देखील उत्पन्नवाढीच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे अर्थसंकल्पात दिसून येत आहे.
या सभेला मुख्य लेखापाल आरती नांगरे, मुख्य अभियंता दिलीप चिदे्र, लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. हा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.