साताऱ्याला ४५ हजार घरकुले मंजूर - मंत्री जयकुमार गोरे 

By नितीन काळेल | Updated: January 27, 2025 19:18 IST2025-01-27T19:18:05+5:302025-01-27T19:18:37+5:30

१०० दिवसांत मान्यता देणार; सोलापूरचे उद्दीष्टही पूर्णमध्ये राजकीय संकेत 

45 thousand houses approved for Satara says Minister Jayakumar Gore | साताऱ्याला ४५ हजार घरकुले मंजूर - मंत्री जयकुमार गोरे 

साताऱ्याला ४५ हजार घरकुले मंजूर - मंत्री जयकुमार गोरे 

सातारा : शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला ४५ हजार ४२२ घरकुले मंजूर झालीत. पुढील १०० दिवसांत सर्वच घरकुलांना मान्यता देऊ, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केली. तसेच सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणारच, असा विश्वासही व्यक्त करत काही राजकीय संकेतही दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री गोरे बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. तसेच समाजातील सर्वात गरीब आणि भूमिहीन घटकांना स्वत:चे हक्काचे पक्के घर उपलब्ध करुन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी राज्याचा ग्रामविकास विभागही अहोरात्र प्रयत्न करतोय. याचाच एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यालाही ४५ हजार ४२२ घरकुलांचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करणार आहोत. लवकरच घरकुलाचा पहिला हप्ताही देण्याचा प्रयत्न आहे.

घरकुलाचा निधीही वाढणार..

पत्रकार परिषदेत घरकुलांसाठी निधी कमी असल्याचा प्रश्न करण्यात आला. यावर मंत्री गोरे यांनी याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. अर`थसंकल्पात रक्कम वाढेल. याबाबत केंद्र शासनाकडेही मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी घरकुलासाठी जागा नसणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये खरेदीसाठी दिले जातात. ही रक्कम दोन लाख रुपये करण्याचा निर्णय घेतोय, अशी माहितीही दिली.

झेडपीत काम करणार नाहीत ते जाणार..

जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेला पूर्णवेळ अधिकारी नसल्याच्या प्रश्नावर मंत्री गोरे यांनी ग्रामविकास खात्याचा मी मंत्री आहे. अधिकाऱ्याला आणणार आहेच. पण, जे अधिकारी चांगले काम करणार नाहीत, ते राहणार नाहीत, असा इशाराही दिला. 

पांडुरंगाची सेवा अन् उद्दिष्ट पूर्ण..

पक्षाने आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले. ज्या कारणासाठी दिले ते टार्गेट साध्य होणार का असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांनाच माहीत आहे की, जे उद्दिष्ट दिलेले असते ते मी पूर्ण करतो. त्यामुळे सोलापूरचे उद्दिष्टीही पूर्ण होईल, असे स्पष्ट करत राजकीय घडामोडीचे संकेतही दिले. तसेच पालकमंत्रीपदामुळे पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवाही करता येईल, असेही दिलखुलासपणे सांगितले.

Web Title: 45 thousand houses approved for Satara says Minister Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.