जिल्ह्यात ४३३ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:41+5:302021-09-11T04:41:41+5:30
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी ४३३ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून तुलनेने कमी तपासण्या ...

जिल्ह्यात ४३३ नवे कोरोनाबाधित
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी ४३३ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून तुलनेने कमी तपासण्या झाल्या असल्या तरी बाधित सापडण्याचे प्रमाण तेच राहिल्याने उत्सव काळात कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासण्या वाढविणे जरूरीचे आहे. गेल्या तीन दिवसांत आरोग्य विभागाने विक्रमी तपासण्या केल्या. त्यातून कोरोना रुग्णवाढीचा दर हा ३ टक्क्यांवर स्थिरावल्याचे चित्र होते. मात्र, शुक्रवारी ९ हजार ७३५ तपासण्यांमधून ४३३ बाधित रुग्ण आढळून आले असल्याने बाधित रुग्णांची संख्या ‘जैसे थे’ राहिलेली आहे. गणेशोत्सवामुळे सर्वच शहरे, तसेच बाजारपेठांच्या गावांमध्ये खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. मागील वर्षीदेखील उत्सवानंतरच रुग्ण वाढले होते. या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या तपासण्या जास्त व्हायला हव्यात, त्याच आता कमी होताना दिसत आहेत. प्रशासनाने कोरोना चाचण्यांवर भर दिल्यास कोरोनाबाधित रुग्ण लवकर आढळून येऊ शकतात.
जावलीत ९, कऱ्हाड ३५, खंडाळा १२, खटाव ६०, कोरेगाव ४८, माण २९, महाबळेश्वर ८, पाटण ६, फलटण ९६, सातारा १०३, वाई १८ व इतर ९, असे आजअखेर एकूण २ लाख ४३ हजार ९०१ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्याही शुक्रवारी वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कऱ्हाड १, माण १, फलटण १, असे एकूण ३ रुग्ण मृत्युमुखी पडले. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १०२ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात १९ हजारांच्या वर तपासण्या
जिल्ह्यामध्ये कोरोना तपासण्यांचा टप्पा १९ हजारांच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ लाख ४ हजार २२७ तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून आतापर्यंत २ लाख ४३ हजार ९०१ रुग्ण आढळून आले होते, तर २ लाख ३१ हजार ७२८ लोक कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ९ हजार ९८ रुग्णांवर तपासण्या सुरू आहेत.