शहरातील ३८ मिळकती हेरिटेजमध्ये
By Admin | Updated: August 19, 2014 23:44 IST2014-08-19T23:00:53+5:302014-08-19T23:44:37+5:30
सातारा : १११ मिळकतींना मुख्याधिकाऱ्यांनी दिली क्लिन चिट

शहरातील ३८ मिळकती हेरिटेजमध्ये
सातारा : शहरातील ऐतिहासिक व वास्तुशास्त्रीयदृष्ट्या वारसा असणाऱ्या ३८ इमारतींची यादी सातारा नगरपालिकेने प्रसिध्द केली आहे. १११ मिळतींवरील हेरिटेजची टांगती तलवार मुख्याधिकाऱ्यांनी दूर केली आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने ९ जानेवारी २0१३ चा शासन निर्णयानुसार हेरिटेज नियमावली मंजूर केली आहे. एका संस्थेमार्फत शासनाने शहरातील मिळकतींची माहिती मिळवून एकूण १४९ मिळकती हेरिटेज वास्तूमध्ये घेतल्या होत्या. ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर शहरातील अलिकडच्या काळात बांधलेली घरेही हेरिटेजमध्ये घेण्यात आल्याचे समोर आले. हेरिटेजच्या नियमानुसार या इमारतीची पुनर्बांधणी करताना शासनाचा प्रतिबंध येणार आहे. पालिकेने याबाबत हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार १११ इमारती या यादीतून वगळण्यात आल्या आहेत.
नवीन यादीनुसार अदालतवाडा, मंगळवार तळे, बहुलेश्वर मंदिर, गणेश्वर मंदिर, भटजी महाराज मठ, विठ्ठल रखुमाई मंदिर, महाकाली देवी मंदिर, प्रतापसिंह हायस्कूल, नवीन राजवाडा, दगडी इमारत, उत्तराभिमुखी मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर, जिल्हाधिकारी निवास, जिल्हाधिकारी कार्यालय, फोडजाई मंदिर, आॅफिसर्स क्लब, सेंट थॉमस चर्च, अमेरिकन चर्च, आंबेडकर निवास, पारशी आग्यारी, श्री राम मंदिर, श्री बालाजी मंदिर, बागडे विठ्ठल मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, फुटका तलाव, कमानी हौद, शाही मस्जिद, राजेश्वर मंदिर, टिळक मेमोरियल चर्च, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा कारागृह, पोलीस हेडक्वॉटॅर, दफन भूमी, रयत शिक्षण संस्था सयाजी हायस्कूल, कोटेश्वर मंदिर, बाजीराव विहिर, जलमंदिर
या इमारती हेरिटेज वास्तू ठरल्या आहेत.
या यादीत असलेल्या मिळकतधारकांना नियम ४.४ मधील तरतुदीनुसार प्रसिध्दी दिनांकाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत संचालक, नगररचना महाराष्ट्र राज्य, पुणे सेंट्रल बिल्डिंग, स्टेशन रोड, पुणे १ यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे. (प्रतिनिधी)