३७ कंत्राटी कामगार चार महिने बिनपगारी
By Admin | Updated: November 23, 2014 23:47 IST2014-11-23T21:39:49+5:302014-11-23T23:47:56+5:30
दिवाळीही झाली कडू : क्षयरोग नियंत्रण पथकातील कर्मचारी हवालदिल

३७ कंत्राटी कामगार चार महिने बिनपगारी
सातारा : क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात काम करत असलेले जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी जुलैपासून बिनपगारी काम करत आहेत. त्यांना इतर कोणतेही भत्ते मिळालेले नसल्याने त्यांची दिवाळी कडू झाली असून, दैनंदिन खर्चही भागवणे अवघड झाला आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत क्षयरोग नियंत्रण पथकांतर्गत ३७ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक वरिष्ठ पर्यवेक्षक, नऊ वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, नऊ वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, चौदा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन क्षयरोग एचव्ही, एक डीईओ यांचा समावेश आहे. त्यांचे कंत्राट दरवर्षी नूतनीकरण होत असते; पण वेळेवर पगार होत नसल्याने त्यांच्यासमोर नवीनच समस्या उद्भवली आहे. यासंदर्भात या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील क्षयरोग नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगारांना वेतन अथवा कोणतेही भत्ते दिलेले नाहीत. गरजेपोटी प्रत्येकी फक्त सात हजार रुपये दिले. ही रक्कम तुटपुंजी असून, वेळेवर वेतन न मिळाल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक, शारीरिक व मानसिक कोंडी निर्माण झाली आहे. चार महिने आम्ही पगार नसल्याचे कारणामुळे कोणत्याही प्रकारचा काम बंद अथवा दिरंगाई केली नाही. या उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मौखिक आदेशाचे पालन करत कार्यक्षेत्रात क्षयरोग नियंत्रणाचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले.
सहसंचालकांनी दिलेल्या पत्रानुसार आॅक्टोबरमध्ये तरी पगार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला एक महिन उलटूनही पगार अजून झाला नाही. वास्तविक सर्व कर्मचारी कंत्राटी असून, क्षयरोगासारख्या अतिभयंकर आजाराच्या रुग्णांसोबत काम करतो. सर्व कर्मचाऱ्यांची कौटुंबिक स्थिती ढासळत चालली आहे. चार महिने न झालेल्या पगारामुळे कोणत्याही प्रकारचा सण समारंभ आम्हास करता आला नाही. याऊलट आमचा दैनंदिन गरजा जसे की रेशनिंग, गॅस, पेट्रोल, मुलांची शैक्षणिक फी, नातेवाइकांचे आजारपण पार पाडू शकत नसून आम्हाला कौटुंबिक बाबींची पूर्तता करण्यास आम्ही असमर्थ आहोत. तरी थकित पगार लवकरात लवकर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ३२ जणांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)