३६६ पोलीस कायद्याच्या कचाट्यात
By Admin | Updated: December 11, 2014 23:48 IST2014-12-11T21:43:53+5:302014-12-11T23:48:27+5:30
तक्रारींचा पाढा : खाकीविरोधातील फिर्यादींमध्ये सातारा महाराष्ट्रात पाचवा--सीआयडी रिपोर्ट

३६६ पोलीस कायद्याच्या कचाट्यात
मोहन मस्कर-पाटील - सातारा महाराष्ट्रात पोलिसांच्या विरोधातील तक्रारी वेगाने वाढत असतानाच त्याला सातारा जिल्हादेखील अपवाद ठरलेला नाही. महाराष्ट्रात पोलिसांविरोधात दाखल झालेल्या ७२८0 पैकी ३६६ तक्रारी या एकट्या सातारा जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे लक्षात घेता पोलिसांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सातारा पाचव्या क्रमांकावर आहे.
‘राज्य गुन्हे अन्वेषण विभाग’ तथा ‘सीआयडी’चा २0१३ चा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला असून त्यामध्ये पोलिसांविरोधात दाखल झालेल्या अत्याचाराचे एक स्वतंत्र सात पानी प्रकरण आहे. त्यामध्ये सर्व गुन्ह्यांचा तपशील देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात २0१२ मध्ये पोलिसांच्या विरोधात ६९२५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, २0१३ चा विचार करता यामध्ये ५.१३ टक्के वाढ झाली आहे. २0१३ मध्ये महाराष्ट्रात ७२८0 तक्रारी पोलिसांविरोधात दाखल आहेत. यापैकी सातारा जिल्ह्याचा पाचवा क्रमांक असून येथील तक्रारी ३६६ इतक्या आहेत. सर्वाधिक १२0८ तक्रारी मुंबई शहरात दाखल आहेत. त्या खालोखाल ठाणे ग्रामीण ७७५, सोलापूर ग्रामीण ५४५ आणि पुणे शहर ४८५ आणि नंतर सातारा असा क्रमांक लागतो.
सातारा जिल्ह्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीवरील सुनावणी पूर्ण होत आली आहे. एका प्रकरणात किरकोळ शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी सातारा पोलीस मुख्यालयात एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार झाली होती. यानंतर बरेच वादंग माजले होते. पोलीस अधीक्षक प्रसन्ना नेहमीच अनेक राजकीय संघटनांच्या रडारवर राहिले. परिणामी विविध आंदोलनांचा केंद्रबिंंदू जिल्हाधिकारी कार्यालय न होता तो पोलीस मुख्यालय बनला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सीताराम मोरेंच्या विरोधातही अनेक तक्रारी झाल्या होत्या.
पोलीस ठाण्यात पोलिसांकडून मिळणारी वागणूक, ठाणे अंमलदाराचे वर्तन या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, राजकीय संघटना, सामाजिक कार्यकते त्याचबरोबर इतर अशा तक्रारींचा नेहमीच पाढा असतो. यापैकी बहुतांशी तक्रारी लेखी तर काही तक्रारी तोंडी असतात.
काही तक्रारी रेकॉर्डवर येतात तर काही तक्रारीत ज्याच्यावर तक्रार झाली आहे अशा कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला समज देऊन त्यावर पडदा टाकला जातो. मात्र, काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीच्या तक्रारीही झाल्या आहेत. यापैकी काही तक्रारी या जाणीवपूर्वक असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. विविध कारवाईनंतर पोलिसांचा बदला घेण्यासाठी अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत असल्याचे सांगितले जाते.
मानवी हक्कांचे उल्लंघन नाही...
सातारा जिल्ह्यात २०१३ मध्ये पोलिसांच्या विरोधात जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यापैकी एकही तक्रार मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे, अशा आशयाची नसल्याचे सीआयडीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. काहीदा पोलिसांकडून त्रास देत असल्याच्या त्याचबरोबर जाणीवपूर्वक मारहाण, एखाद्या राजकीय दबावाखाली झालेली कारवाई अशा कितीतरी तक्रारी सातारा जिल्ह्यात पोलिसांविरोधात झाल्या आहेत. यामुळे मात्र, सातारच्या पोलिसांविषयी चर्चा रंगायला लागल्या आहेत.
पोलिसांच्या विरोधात दाखल तक्रारी
जिल्हा / विभागअत्याचार
सोलापूर ग्रामीण ५४५
सातारा३३६
सांगली१६६
पुणे ग्रामीण१३४
कोल्हापूर१७
एकुण१,२२८
लाचखोरीतही पोलीस नंबर वन
सातारा जिल्ह्यात पोलीस दलातही लाचखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आता लाच घेण्यामध्ये तलाठ्यांनाही मागे टाकले आहे. २0११ ते २0१४ ची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात २0 पोलीस लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक तर उर्वरितांमध्ये हवालदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच काळात लाच घेताना पकडलेले तलाठी १७ आहेत.