प्राप्तीविना ३,५00 शिक्षकांचे जगणे बनले मुश्कील

By Admin | Updated: December 12, 2014 23:45 IST2014-12-12T22:19:44+5:302014-12-12T23:45:24+5:30

पगारच मिळत नाही : विनाअनुदानितच्या नावाखाली ‘शिस्तबद्ध शोषण’--हतबल गुरुजींचा निबंध - चार

3,500 teachers became alive without getting acquainted | प्राप्तीविना ३,५00 शिक्षकांचे जगणे बनले मुश्कील

प्राप्तीविना ३,५00 शिक्षकांचे जगणे बनले मुश्कील

मोहन मस्कर-पाटील-सातारा  -जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या ३,५00 शिक्षकांचे जगणे मुश्कील बनले आहे. एका बाजूला पगार नाही आणि दुसरीकडे आपली शाळा शंभर टक्के वेतनप्राप्त कधी होईल, याची खात्री नाही. परिणामी विनाअनुदानितच्या नावाखाली हजारो शिक्षकांचे ‘शिस्तबद्ध शोषण’ सुरू आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विनाअनुदानित शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातून (कोल्हापूर विभाग) मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात आजमितीस ५५0 शाळा या खासगी शिक्षण संस्थांच्या असून, यापैकी ३५0 शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या ३,५00 शिक्षकांनी सरकारी पगार म्हणजे काय, याचा अनुभव घेतलेला नाही. हा अनुभव भविष्यात कधी मिळेल की नाही याची खात्री नाही.
साल २000 उजाडले आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगीकरणाचे वारे आले. त्याचा परिणाम असा झाला की, शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याला मनुष्यबळाची निर्मिती म्हणून खासगी शिक्षणशास्त्र पदवी, पदविका आणि पदव्युत्तर महाविद्यालयांची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली. यातून शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला असला तरी २00८ नतंर मात्र त्याचा फटका बसू लागला आहे. ज्या शिक्षणसम्राटांनी शाळांची उभारणी केली त्यांना आणि कार्यरत शिक्षक, शिक्षिकांना आपली शाळा आज ना उद्या अनुदानित होईल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. आता तर त्याचा परिपाक न विचारण्याच्या पलीकडे गेला आहे.
शासनाचे शिक्षणविषयक असणारे निकष दरवर्षी बदलत राहिल्यामुळे आणि खासगीकरणाचे स्तोम माजविण्यात आल्यानंतर विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची मोठी फळी निर्माण झाली. मात्र, विनाअनुदानितच्या नावाखाली या शिक्षकांचे अगदी ‘शिस्तबद्ध शोषण’ सुरू आहे. हे शोषण कधी थांबेल की नाही, याची खात्रीच देता येत नाही.

अनेकांनी टाकले स्वत:चे व्यवसाय
भारतीय समाजात शिक्षकाची नोकरी अतिशय प्रतिष्ठेची आणि सन्मानाची मानली जाते. त्यामुळे बारावीनतंर ‘डीएड’ अथवा पदवीधर झाल्यानंतर ‘बीएड’ पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आता याला थोड्याफार प्रमाणात अटकाव बसला आहे. मात्र, शिक्षणाची शंभर टक्के खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २000 ते २0१३ या कालावधीत अनेक शिक्षकांनी वेतन मिळत नसल्यामुळे नोकरी सोडून देऊन इतर व्यवसाय सुरू केले आहेत. काहींचे व्यवसाय जोरात सुरू असून यापूर्वीच जर असे केले असते तर शिक्षक म्हणून काम करत असतानाचे आपले आयुष्य वाया गेले नसते, असेही अनेकजण सांगतात.


विनाअनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे जगणे आता भयावह बनले आहे. वेतन नाही, वैद्यकीय लाभ नाहीत. काहीनी तर नोकऱ्याच सोडून मोलमजुरी करणे सुरू केले आहे. ही भयावह परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण क्षेत्राकडे शासनाने गांभीर्याने पाहायला पाहिजे.
- अशोकराव थोरात, अध्यक्ष,
राज्य शिक्षण संस्था महामंडळ


शिक्षक, शिक्षिकांचे विवाह रखडले..!
शासनाच्या विनाअनुदानित धोरणाचा फटका मोठ्या प्रमाणात सामाजिकीकरणावर झाला आहे. या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना तुटपुंजे वेतन मिळते. अनेकदा तर ते मिळतच नाही. त्यामुळे त्यांची अनेकदा आर्थिक ओढाताण होते. यातून मार्ग काढणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. अशातच शिक्षकांना त्याचा फार मोठा फटका बसला आहे. नोकरी आहे, मात्र पगार नाही आणि पगार असेल तर तो थोडाच आहे. नोकरी असली तरी त्याची शाश्वती नाही. अनुदान कधी मिळले आणि आपल्या हाती शंभर टक्के वेतन कधी येईल, याची शंभर टक्के खात्री नाही. अशा कारणांमुळे अनेक शिक्षकांचे विवाह रखडले आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शेकडो शिक्षकांनी आता आपल्या वयाची चाळीशी उलटली आहे. परिणामी त्यांना कोणी मुलगी कोणी द्यायला तयार नाही. काही शिक्षिकांचीही तीच अवस्था आहे.


असे आहेत विनाअनुदानितचे प्रकार
विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक म्हटले की त्यामध्ये साधारणत: चार टप्पे येतात.
‘स्वयंअर्थसहाय्यित’ आणि ‘कायम विनाअनुदानित’ असे दोन प्रकार आहेत.
‘विनाअनुदानित’ हा एक प्रकार असून, या प्रकारातील शाळा आज ना उद्या आपल्याला अनुदान मिळेल, या आशेवर आहेत.
‘अनुदानित शाळां’मध्ये असणाऱ्या ‘विनाअनुदानित’ तुकड्या ही एक आणखी मोठी गोची आहे.
शिक्षण संस्थांचेही मोठे दुखणे आहे ते म्हणजे ज्या संस्थांना शंभर टक्के अनुदान आहे. मात्र, अनेक संस्थांना ते मिळालेले नाही आणि यापुढील काळातही ते मिळेल की नाही, याविषयी काही सांगता येत नाही.
विनाअनुदानीत शाळांवर काम करत असलेल्या शिक्षकांना ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने अनेकदा मदत करतात.

Web Title: 3,500 teachers became alive without getting acquainted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.