३२ फूट खोलीचा तलाव अवघ्या पाच फुटांवर!
By Admin | Updated: August 12, 2016 00:06 IST2016-08-12T00:05:27+5:302016-08-12T00:06:28+5:30
शासनाचे दुर्लक्ष : ब्रिटिशकालीन तलाव, पाटाचीही दुरवस्था

३२ फूट खोलीचा तलाव अवघ्या पाच फुटांवर!
मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलाव १२५ वर्षांकडे वाटचाल करत असला तरी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. प्रारंभी ३२ फूट खोली असणारा तलाव सध्या केवळ ५ फुटांवर आला असून, या तलावातून शेती पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाटाचीही दुरवस्था झाली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील डोंगर उतारावर मायणी येथे ब्रिटिशांनी तलावाची बांधणी केली. या तलावाच्या कामाला कधी सुरुवात झाली हे निश्चित सांगता येत नाही; पण १८९६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १८९६ मध्ये हे काम सुरू होते याची नोंद चांगदेव खैरमोडे यांच्या चरित्र ग्रंथात आहे.
याकाळी ५०० एकरांत ३२ फूट खोलीचे या तलावाचे बांधकाम १९०० साली पूर्ण झाले. त्यावेळी जुना सातारा जिल्हा अस्तित्वात होता. त्यावेळी मायणी, माहुली, चिखळहोळ आदी भागांतील क्षेत्र ओलिताखाली येत होते.
यासाठी तलावाच्या सांडव्याच्या बाजूस असलेल्या दगडी भिंतीच्या प्रारंभीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता. त्या दरवाजातून पाटाचे पाणी शेतीला दिले जात होते. त्यामुळे या पाटाच्या दोन्ही बाजूस सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत काळीभोर सुपीक जमीन आहे.
जर या तलावातील गाळ काढला तर मायणी व परिसरातील शेत जमिनीचा कायमचा पाणी प्रश्न मिटेल तसेच याच तलावावरील भागातून (पूर्व-दक्षिण) टेंभू योजनेचा कॅनॉल सोलापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून जात आहे.
या पाटातून नैसर्गिंक उतारानेही पाणी तलावात येऊ शकत असल्याचे त्याच्या रचनेवरून वाटते.
जर तलावात पाणी आले तर सातारा जिल्ह्यातील मायणी, चितळी, कलेढोण आदी भागांसह सांगली जिल्ह्यातील माहुली, चिखळहोळ आदी भागांचा शेतीपाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. (वार्ताहर)