सातारा : सातारा शहरातील स्वातंत्र संग्रामाचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या प्रतिसरकार स्मारकास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी २५ लाख रुपयांचा निधी खासदार फंडातून दिला आहे. स्मारक समितीने खासदार शरद पवार यांच्याकडे स्मारक उभारणीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध केला आहे. आता जिल्हा नियोजन समितीतूनही आणखी निधी या स्मारकास उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा स्मारक समितीकडून होत आहे.भारतीय स्वातंत्र्यता आंदोलन १९४२ चले जाव स्वातंत्र्य संग्रामाचा अविभाज्य ऐतिहासिक घटक सातारचे प्रतिसरकार आहे. या आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मारक उभारणीस तत्कालीन प्रधानमंत्री पी. नरसिंहराव यांनी स्मारकास एक कोटी शासकीय भूखंडासहित उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. याबाबत केंद्र सरकारच्या स्तरावरील सुकाणू समितीने राज्यासाठी एक उपसमिती तत्कालीन मुख्यमंती शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. तसेच हे स्मारक उभारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तसेच हुतात्मा स्मारक सुशोभीकरण, दुरुस्ती, आदी बाबींसाठी हीरक महोत्सवी वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५-१६ मध्ये राज्यासहित इतर जिल्ह्यातही निधी दिला होता. मात्र, सातारचे प्रतिसरकार स्मारक उभारणीस निधी मिळाला नाही. २०१०-११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एन. रामास्वामी यांनी नियोजन समितीतून ४६ लाख रुपये उपलब्ध केले होते. यातून सध्याचे संरक्षक भिंत, क्रांती स्तंभ शिल्प उभारण्यात आले. त्यानंतर हीरक महोत्सवी वर्षात स्मारकाला निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे स्मारक समितीने खासदार शरद पवार यांना त्यांच्या फंडातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
त्यानुसार खासदार शरद पवार यांनी नुकताच २५ लाखांचा निधी या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी उपलब्ध केला आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम मार्गी लागणार आहे. या निधीसाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी सातत्याने खासदार पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या निधीच्या उपलब्धतेबद्दल स्मारक समितीचे शिवाजी राऊत, अस्लम तडसरकर, विजय निकम, ज्ञानदेव कदम, विक्रांत पवार, मुनवर कलाल, सईद कुरेशी, आदींनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक वर्षांपासून दुर्लक्षितब्रिटिशांविरोधात बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये भागलपूर येथेही प्रतिसरकारने लढा दिला आहे. तथापि, ती प्रतिसरकारे फार काळ टिकू शकली नाहीत. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या प्रतिसरकारने मोठी कामगिरी केली. स्वातंत्र्यलढ्यात साताराचे योगदान प्रतिसरकारच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय आहे. मात्र, या इतिहासाची जपणूक करण्यासाठी तातडीने निधीची गरज असून, खासदार शरद पवार यांच्याप्रमाणे इतरही लोकप्रतिनिधींनी आपल्या फंडातून निधी देण्याची गरज आहे.