२.४४ लाख बालक ांना पल्स पोलिओचे डोस
By Admin | Updated: January 20, 2015 00:00 IST2015-01-19T22:47:02+5:302015-01-20T00:00:49+5:30
दिलीप माने : ऊसतोड मजुरांची पाले, विटभट्ट्यांवरही राबविली मोहीम

२.४४ लाख बालक ांना पल्स पोलिओचे डोस
सातारा : ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी जिल्ह्यातील पाच वर्षांखालील २ लाख ४४ हजार ६१९ बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले,’ अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांनी दिली.
पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार २८३ व शहरी भागात १४८ अशी एकूण २ हजार ४३१ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, टोलनाके आदी ठिकाणी ग्रामीण भागात १०६ व नागरी भागात २८ अशी एकूण १३४ पल्स पोलिओ ट्रान्झिट बुथ कार्यरत होती. ग्रामीण भागात १३९ व शहरी भागात ३६ व मोबाईल मेडिकल युनिट १ अशा १७६ मोबाईल टीमनी वीटभट्ट्या, बांधकामावरील कामगार, ऊसतोड मजूर आदी या ठिकाणी काम करणाऱ्या मजूरांच्या बालकांना डोस पाजण्याचे काम चोख बजावले. मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागात मिळून ५ हजार ९८२ अधिकारी व कर्मचारी तसेच ४८५ पर्यवक्षक कार्यरत होते. जिल्ह्यात या मोहिमेसाठी १ हजार ९२३ टीमस तयार केल्या.
जिल्ह्यात नोंदण्यात आलेल्या २ लाख ४२ हजार ८५७ लाभार्थ्यांपैकी ग्रामीण भागात २ लाख २० हजार ४०८ तर शहरी भागात २४ हजार २११ असे एकूण २ लाख ४४ हजार ६१९ बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले. चुकून पोलिओचा डोस घेण्याचे राहून गेलेल्या बालकांना २२ पर्यंत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकांमार्फत पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. पल्स पोलिओच्या दुसऱ्या टप्प्यात २२ फेब्रुवारी रोजीही आपल्या पाच वर्षांखालील बालकांना बुथवर घेऊन यावे, असे आवाहनही डॉ. माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)