२३ ठरावांना २३ मिनिटांत मंजुरी
By Admin | Updated: January 23, 2016 00:52 IST2016-01-22T23:29:49+5:302016-01-23T00:52:51+5:30
फलटण पालिका सभा : विविध ठराव; फलक लावणाऱ्यांवर फौजदारी

२३ ठरावांना २३ मिनिटांत मंजुरी
फलटण : फलटण नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस महाराजा मालोजीराव नाईक-निंबाळकर भवन असे नाव देण्यात यावे, या ठरावासह एकूण २३ ठरावांना २३ मिनिटांत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या फलकवर बंदी घालण्याचा व फलक लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मंजूर करण्यात आला.
फलटण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संजीवराजे नाईक-निंबाळकर सभागृहात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सारिका जाधव होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, अनिल जाधव, नंदकुमार भोईटे, जालिंदर जाधव, पै. हेमंत निंबाळकर, सुरेश पवार, अनुप शहा, सुरेश पवार, अॅड. मधुबाला भोसले, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, संगीता शिंदे, मुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सभेत फलक, होर्डिंग्ज बोर्ड, फलक बंदीचा अंत्यत महत्त्वाचा ठराव संमत झाला. शनिवारपासून शहरात फलक, होर्डिंग्ज बोर्ड, फलक दिसणार नाहीत. दिसले तर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तसेच रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सुचविलेल्या नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस महाराजा मालोजीराव नाईक-निंबाळकर भवन असे नाव आणि नगर परिषद मंजूर विकास आराखडा आ.क्र. ८७ येथील शॉपिंग सेंटरला राजधानी टॉवर्स असे नाव देण्याचा ठराव संमत झाला. (प्रतिनिधी)
कामांनाही मंजुरी...
सुधारित जलशुद्धीकरण केंद्र येथे वॉचमन केबीन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा वितरण नलिकेवरील नादुरुस्त व्हॉल्व बदलण्याच्या कामाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून पंढरपूरकडे जाणाऱ्या निरा-उजव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याची उत्तरेकडील साईडपट्टी खडीकरण, डांबरीकरण करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.