इतिहासाच्या प्रेमापायी २२ वर्षांची तपश्चर्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:34+5:302021-02-13T04:38:34+5:30
इतिहासाकडे विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहणारे साताऱ्यातील काही युवक २२ वर्षांपूर्वी एकत्र आले. इतिहासाच्या अनोख्या प्रेमापायी त्यांनी गडकोट संवर्धनाची मोहीम हाती ...

इतिहासाच्या प्रेमापायी २२ वर्षांची तपश्चर्या!
इतिहासाकडे विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहणारे साताऱ्यातील काही युवक २२ वर्षांपूर्वी एकत्र आले. इतिहासाच्या अनोख्या प्रेमापायी त्यांनी गडकोट संवर्धनाची मोहीम हाती घेतली. इतिहासाकडे डोळसपणे पाहत आपले तन, मन आणि धन देणारे जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे मावळे अत्यंत आवडीने या कामात गुंतलेले आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने गडकोटांवर जाऊन प्रेमाचा इजहार करणाऱ्या तरुण-तरुणींच्या डोळ्यांत इतिहासवेड्या या तरुणांनी अंजन घालण्याचे काम केले आहे. न्यू इंग्लिश स्कूलमधील ९ वी व १० वीमधील युवकांचा ग्रुप अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरायला गेला असताना किल्ल्यावरील भग्नावस्था पाहून हे युवक अस्वस्थ झाले. किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक गोष्टींचे रोल कॅमेऱ्यातून फोटो काढून दस्तऐवज तयार करण्याचा निर्णय या युवकांनी घेतला. १९९८ मध्ये कामाला सुरुवात झाली. रोल डेव्हलपमेंटसाठी पुण्याला जावे लागे. त्याकाळी १० ते १२ हजार रुपये खर्चून युवकांनी हा दस्तऐवज तयार केला.
अजिंक्यतारा संवर्धनाची मोहीम हाती घेणे अत्यावश्यक होते. दूरदर्शनच्या टॉवरच्या कामासाठी आणलेली वाळू ऐतिहासिक दरवाजाजवळ टाकण्यात आली होती. या वाळूमुळे शिवकालीन दरवाजाला वाळवी लागली होती. जिज्ञासा मंचच्या मावळ्यांनी ही वाळवी हटविण्याचा चंग बांधला. औंध म्युझियमचे तत्कालीन सहायक अभिरक्षक प. ना. पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार पारंपरिक पध्दतीने करंजी व लिंबूनीचे तेल पिचकारीमधून दरवाजाच्या वाळवीवर सोडले. तेव्हापासून वाळवी गायब झाली, ती आजतागायत वेळोवेळी केलेल्या संवर्धनामुळे या दरवाजाला वाळवी लागलेली नाही. दरवाजा वाचवल्यानंतर या युवकांमध्ये उत्साह आणखी वाढला. बुरुजात घुसलेल्या झाडांच्या मुळ्या काढून टाकण्याची दुसरी मोहीम हाती घेतली. पारंपरिक केमिकलचा वापर करुन गडावरच्या सर्वच बुरुजांवरच्या मुळ्या संपुष्टात आणून बुरुज वाचवले. नंतर अजिंक्यतारा किल्ल्यावरील राजसदर ढिगाऱ्यातून बाहेर काढली. अशा असंख्य गोष्टी जगासमोर आणण्याचे काम जिज्ञासाच्या माध्यमातून सुरु आहे. संग्रहालय दिन भारतभर साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘तिमिर भेद’ ही व्याख्यानमाला सात वर्षांपासून ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. साताऱ्यातील ऐतिहासिक संग्रहालयात साताऱ्याचा इतिहास मांडणारं स्वतंत्र दालन सुरू करण्यासाठी प्रयत्न असल्याची माहिती जिज्ञासाचे सचिव योगेश चौकवाले यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत मंडपे, कार्याध्यक्ष निलेश पंडित, शीतल दिक्षित, सागर गायकवाड, नितीन पवार, अमृत साळुंखे अशी जिज्ञासाची टीम अनेक वर्षांपासून एकत्र येत काम करत आहे. इतिहासावरचं आगळवेगळं प्रेम त्यांनी साकारलेलं आहे.
चार भिंतीवर अनोखी रंगपंचमी
सातारा पालिकेच्यावतीने येथील ऐतिहासिक चार भिंती स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र, अनेक प्रेमवीर भिंतींवर चुना लावून आपली नावे कोरत. या भिंती खराब केल्या होत्या. जिज्ञासाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घेऊन चार भिंती स्मारकाच्या संवर्धन व पावित्र्य राखण्यासाठी रंगपंचमी दिवशी वेगळी मोहीम आखली. बदामाच्या आकाराचा फलक जिज्ञासातर्फे चार भिंतीजवळ लावण्यात आला. प्रेमवीरांनी चार भिंतीवर काही न लिहिता आपल्या प्रेमाचा इजहार या बदामावर करावा, अशी अनोखी संकल्पना राबविण्यात आली. सलग पाच वर्षे ही मोहीम सुरू होती.
पॉइंटर
जिज्ञासाने संवर्धन केलेल्या ऐतिहासिक गोष्टी
- परळीतील कॅट्रापूलर गोफण भारतातील एकमेव विरगळ
- ५० शिलालेख व १० ताम्रपट
- शिरवळ येथील पाणपोई
- किकली, परळी येथील मंदिरे
- शाहूकालीन पाणी योजना
सागर गुजर
फोटो : १२जिज्ञासा