खासगी सावकारीप्रकरणी २० जणांवर गुन्हा; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:01 IST2017-09-25T23:01:32+5:302017-09-25T23:01:32+5:30

खासगी सावकारीप्रकरणी २० जणांवर गुन्हा; एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : व्याजाने घेतलेले पैसे माघारी देऊनही दमदाटी करीत अधिक रक्कम व धनादेश घेतल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात प्रदीप दत्तात्रय जाधव (वय २८), संदीप दत्तात्रय जाधव (दोघेही रा. संगमनगर-खेड, सातारा), बाळा खुडे, मयूर गवळी, रोहित (पूर्ण नाव, पत्ता नाही) आणि इतर अनोळखी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. प्रदीप जाधवला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विकास बापू माने (वय ३५, रा. शाहूनगर, सातारा) या व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार माने यांनी एकाकडून साडेतीन लाख रुपये १५ टक्के व्याजाने घेतले होते.
माने यांनी संबंधिताला घेतलेले पैसे परत केले होते. तरीही व्याजाने पैसे देणाºयाकडून माने यांना अधिक पैशाची वारंवार मागणी करून दमदाटी करण्यात येत होती. साताºयातील महाराजा सयाजीराव विद्यालय परिसर, सदर बझार, आदी ठिकाणी दमदाटीचे प्रकार झाले. ‘आम्ही दत्ता जाधवची माणसे आहोत, हिशोब मिटवून टाक’ अशा धमक्याही देण्यात येत होत्या.
अशाप्रकारे फिर्यादीकडून सुमारे एक लाख रुपये जबरदस्तीने अधिक घेण्यात आले. तसेच फिर्यादी मानेंकडून धनादेश घेऊन त्यावर संशयितांनी पाच लाखांचा आकडाही लिहिला. अशा कारणामुळे विकास माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे.