बारावी पास आमदारांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करावा
By Admin | Updated: August 18, 2014 21:35 IST2014-08-18T21:11:22+5:302014-08-18T21:35:58+5:30
मनोज घोरपडे : वातावरण बदलल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून बेताल वक्तव्ये

बारावी पास आमदारांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करावा
कोरेगाव : बारावी पास आमदारांनी प्रत्येक क्षेत्राचा नीट अभ्यास करावा. मगच व्यवस्थित प्रतिक्रिया द्यावी, असा सणसणीत टोला कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी लगावला.
आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रामाणिकपणे ऊर्जा क्षेत्राला बळ देण्यासाठी पवनचक्की उभारणीत करिअर केले म्हणून आमदारांना पोटशूळ उठण्याचे कारण नाही. आम्ही राजकारणातून कधी पैसा हडप केला नाही की शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन राजकारण केले नाही. स्वत:च्या साखर कारखान्यात टनाला एकशे सत्तर किलो काटामारी करून शेतकऱ्यांच्या उसाची फसवणूक केली नाही, असे सांगून घोरपडे पुढे म्हणाले की, ‘आम्ही कायदेशीर पवनचक्की प्रकल्प उभा करून तब्बल सातशे बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. शासनाला महसूलही दिला आहे. वीज टंचाईने ग्रासलेल्या राज्याला ऊर्जाही मिळवून दिली आहे. हे सारे डोळ्याआड करून अर्धवट शिक्षणाच्या अज्ञानातून बेताल वक्तव्य करण्यास आमदारांनी सुरुवात केली आहे.
रिकीबदारवाडी, ता. कोरेगाव येथे बैठकीत त्यांनी ग्रामस्थाशी संपर्क साधला. या गावाने आतापर्यंत सत्ताधारी नेत्यांना झुकते माप दिले. मात्र, पदरात कधीच काही टाकले नाही. स्मशानभूमीचा प्रश्न व कब्रस्तानच्या वॉल कम्पाउंडच्या प्रश्नालाही त्यांना न्याय देता आला नाही. निवडणुका झाल्या की विकासकामांपेक्षा वेळकाढूपणा करायचा हेच त्यांचे जुने उद्योग आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
स्वत:चे अर्धवट शिक्षण झाकण्यासाठी कसरत
‘कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी स्वत:चे अर्धवट शिक्षण झाकण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याशी स्वत:ची तुलना करतात. ते श्रेष्ठ नेते कुठे अन् तुमची शैक्षणिक पात्रता काय ? याचा तरी किमान तुलना करताना विचार करायला हवा होता,’ अशीही खरमरीत टिका मनोज घोरपडे यांनी केली. पातळी सोडून आमच्या कुटुंबावर वैयक्तिक टिका कराल तर तुमच्यावर समाजात लपवून तोंड फिरण्याची वेळ येईल, असाही इशारा यावेळी घोरपडे यांनी दिला.