१०,६६६ सातारकर म्हणतात, कोणीच नको
By Admin | Updated: October 20, 2014 22:36 IST2014-10-20T21:51:54+5:302014-10-20T22:36:27+5:30
विधानसभा निवडणूक निकाल : लोकसभेच्या तुलनेत नोटाचा प्रभाव वाढला

१०,६६६ सातारकर म्हणतात, कोणीच नको
मोहन मस्कर-पाटील - सातारा जिल्ह्यात आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले असले तरी १०,६६६ मतदारांनी ‘नोटा’ तथा ‘वरीलपैकी कोणीही नको’ यास पसंती दिली आहे. सर्वाधिक ‘नोटा’चा वापर सातारा विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी वापर पाटण विधानसभा मतदारसंघात झाला आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला नोटाचा प्रभाव वाढला आहे.
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत बुधवार, दि. १५ रोजी मतदान झाले. यावेळी ८७ उमेदवार आमदारकीसाठी नशीब आजमावत होते. विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघांत २३ लाख ५९ हजार ४१३ इतकी मतदारसंख्या होती. मात्र, यापैकी फक्त १५ लाख ९५ हजार ७९७ इतक्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १० हजार ६६६ सातारकरांनी ‘वरीलपैकी कोणीही नको’ असे सांगत ‘नोटा’चे बटण दाबले. विशेष म्हणजे, ‘नोटा’चा सर्वाधिक वापर सातारा तर सर्वात कमी पाटण मतदारसंघात झाला आहे.
देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांच ‘नोटा’चा वापर झाला. लोकांना मतदान करण्याचा अधिकार असला तरी त्यांना त्याच्याजोडीला नकाराधिकारही असावा, ही यापाठीमागची संकल्पना होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याची सक्षमपणे अंमलबजावणीही करण्यास सुरुवात झाली. ‘नोटा’ म्हणजे ‘वरीलपैकी कोणी नाही’ (नन आॅफ दि अबोव्ह) असा धरला जातो. कोणत्याही मतदान यंत्राच्या अगदी शेवटी नोटाचा पर्याय देण्यात आला आहे. कोणत्याही मतदान यंत्रावर पंधरा उमेदवार आणि नोटा अशी मिळून सोळाच नावे बसू शकतात. मात्र, जर सोळा उमेदवार असले तर ‘नोटा’साठी स्वतंत्र
मतदान यंत्र दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत १०,५५२ ‘नोटा’
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच देशात ‘नोटा’चा वापर झाला. सातारा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही. मात्र, समाविष्ट असणाऱ्या कोरेगाव, सातारा, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि वाई या सहा विधानसभा मतदारसंघांत त्याचा वापर प्रभावी झाला होता. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर १०,६६६ सातारकरांनी केला आहे. यामध्ये फलटण आणि माण मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या सहाही मतदारसंघांत ८,१९४ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. लोकसभा निवडणुकीत मात्र, १०,५५२ लोकांनी ‘नोटा’ला पसंती दिली होती.
गडचिरोली मतदारसंघात ‘नोटा’चा सर्वाधिक वापर
महाराष्ट्रात सर्वाधिक गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १७,५१० मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, येथील भाजपचे विजयी उमेदवार डॉ. देवराव होली यांना ७0,१८५ इतके मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांना १८,२८0 इतकी मते आहेत आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ आहे.
मतदारसंघनिहाय ‘नोटा’
मतदारसंघ नोटा
फलटण १६५६
वाई १३२५
कोरेगाव १९९१
माण ८१६
कऱ्हाड उत्तर १0५६
कऱ्हाड दक्षिण ९३९
पाटण ५५0
सातारा २३३३
एकूण १0६६६