१०० च्या स्टॅम्पला मोजावे लागतात १२० रुपये
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:26:24+5:302014-06-29T00:28:09+5:30
पाटण तहसील कार्यालय : मुद्रांक विक्रीतून पैसा वसुली

१०० च्या स्टॅम्पला मोजावे लागतात १२० रुपये
पाटण : पाटण तहसील कार्यालयात अनेक स्टँप व्हेंडर मुद्रांक विक्रीतून पैसा वसूल करत आहेत. सरकारी दस्तऐवज व मुद्रांक तहसील कार्यालयातून घ्यायचा आणि त्याची नियमबाह्य किंमत ठरवून विक्री करायची, असा गंभीर प्रकार सुरू आहे. परिणामी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर १२० रुपयांना विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
पाटण तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक आणि पोलीस स्टेशन ही तीन महत्त्वांची कार्यालये एकाच छताखाली आहेत. १०० रुपयांचा मुद्रांक १२० रुपयाला विक्री केला जातोय याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना असतानाही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मुद्रांक विक्री करताना दोन शिक्के मारावे लागतात त्याचबरोबर लेखन करावे लागते म्हणून आम्ही २० रुपये जादा घेतो, असे स्टँप व्हेंडर सांगतात. दरम्यान, यासंदर्भात पाटण तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेताना २० रुपये जास्त द्यावे लागत असल्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. याचा फटका तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांना बसू लागला आहे. (प्रतिनिधी)