जिल्हा परिषदेकडून १४७ आरोग्य सेवकांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:47+5:302021-07-07T04:32:47+5:30

ओळी - जिल्हा परिषदेकडील आरोग्य सेवकांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना मनसेच्या वतीने देण्यात ...

Zilla Parishad sacks 147 health workers | जिल्हा परिषदेकडून १४७ आरोग्य सेवकांना डच्चू

जिल्हा परिषदेकडून १४७ आरोग्य सेवकांना डच्चू

ओळी - जिल्हा परिषदेकडील आरोग्य सेवकांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना मनसेच्या वतीने देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असतानाच जिल्हा परिषदेने १४७ आरोग्य सेवकांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर मोठा परिणाम होणार आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सोमवारी दिला.

याबाबत सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. सावंत म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. अशा वेळी जिल्हा परिषदेने १४७ आरोग्य सेवकांना कामावरून कमी केले. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर कर्मचाऱ्यांअभावी नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. लस आली, टोचणारे गेले, अशी अवस्था झाली.

राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. मग कोणाच्या आदेशाने त्यांना कमी केले, याचा खुलासा जिल्हा परिषदेने करावा. प्रशासनाची उधळपट्टी थांबली तरी या कर्मचाऱ्यांचे वेतन भागेल. आरोग्यमंत्री १७ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा करतात, दुसरीकडे जिल्हा परिषद मात्र आरोग्य सेवकांना कामावरून काढून टाकते, हा अन्याय आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही सावंत यांनी दिला.

या वेळी सीमा भोरे, श्रीदेवी जाधव, भाग्यश्री पडुळकर, भारती खोत, वैशाली सातपुते, सारिका कांबळे, चांदणी नदाफ, शीतल लाडी, प्रियंका कांबळे उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad sacks 147 health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.