जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांचा राजीनामा
By Admin | Updated: June 18, 2016 00:14 IST2016-06-18T00:07:37+5:302016-06-18T00:14:03+5:30
विभागीय आयुक्तांकडे सादर : इच्छुकांची मोर्चेबांधणी

जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांचा राजीनामा
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी पुणे येथे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. नव्या अध्यक्षांना अत्यंत कमी कालावधी मिळणार असून, सत्ताधारी राष्ट्रवादीने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे तासगाव तालुक्याला संधी मिळणार आहे. त्यात स्नेहल पाटील, योजना शिंदे, कल्पना सावंत यांची नावे चर्चेत आहेत.
गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेतील सभापतींची निवड झाल्यापासूनच अध्यक्षांचा राजीनामा व नवीन निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी वाढलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता, सत्ताधारी राष्ट्रवादीने सबुरीचे धोरण घेतले होते. अखेर शुक्रवारी होर्तीकर यांना नेत्यांकडून आदेश मिळाला आणि सकाळीच त्या पुण्याला रवाना झाल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सत्ताधारी गटाचे नेते उपस्थित होते. विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सादर केला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाची संधी मिळणार होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारीत असल्याने नव्या अध्यक्षांना आता उण्यापुऱ्या नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. अध्यक्षपद महिलेसाठी राखीव असून तासगाव तालुक्याला संधी दिली जाणार आहे. या तालुक्यातून स्नेहल पाटील, योजना शिंदे, कल्पना सावंत इच्छुक आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीची स्थिती अगोदरच दोलायमान अवस्थेत असल्याने नावाच्या निश्चितीनंतर दगाफटका होणार नाही, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अध्यक्षपदासाठी तासगाव तालुक्यातून नाव सुचविण्याचे अधिकार आमदार सुमनताई पाटील यांना देण्यात आले आहेत. मात्र, हे नाव निश्चित करताना आ. पाटील यांची कसोटी लागण्याची चिन्हे आहेत. आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)
स्नेहल पाटील आघाडीवर
अध्यक्षपदासाठी तासगाव तालुक्यात जोरदार चुरस आहे. कल्पना सावंत (सावळज), योजना शिंदे (मणेराजुरी) आणि स्नेहल पाटील (येळावी) यांनी नेत्यांकडे जोरदार मागणी केली आहे. यातील शिंदे अपक्ष सदस्य असल्या तरी त्या राष्ट्रवादी समर्थक आहेत. अध्यक्ष- पदासाठी शिंदे व सावंत यांच्यातील वादात स्नेहल पाटील यांना संधी मिळू शकते.
नऊ महिन्यांची मिळणार संधी
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून डिसेंबरपासून आचारसंहिता, तर फेब्रुवारीत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षांना केवळ नऊ महिन्यांचीच संधी मिळणार आहे. यातही आचारसंहिता व निवडणुकांची व्यवस्था लक्षात घेतली, तर फारच कमी कालावधी मिळणार आहे.
विरोधकांना
चमत्काराची अपेक्षा
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत असले तरी त्यांच्यातीलच नाराजांची मोट बांधत अध्यक्षपदाच्या निवडीत धक्कातंत्र अवलंबण्याची अपेक्षा विरोधी काँग्रेसचे नेते बाळगून आहेत. यासाठीची चाचपणी करण्याचे सूचक वक्तव्यही नेत्यांनी केल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत चुरस वाढणार आहे.