दिघांची-हेरवाड मार्गावर तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. याप्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतरच खूनाचे कारण स्पष्ट होईल. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सुनील विलास शिंदे (वय ३० रा. घाटनांद्रे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, सुनील शिंदे हा ट्रॅक्टरचालक होता. सकाळी रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह तिसंगी येथे घाटनांद्रे रोडच्या कडेला आढळून आला. मृतदेहाजवळच एक मोठा रक्ताने माखलेला दगड सापडला असून, त्याच दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा हल्ला नियोजित असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
घटनेची माहिती मिळताच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील, सहाययक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. सध्या अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या घटनेचा तपास विविध अंगाने करत असून, लवकरच आरोपीचा सुगावा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.