जयंतरावांच्या विरोधात युवक नेत्यांची कसरत
By Admin | Updated: July 28, 2014 00:00 IST2014-07-27T23:39:44+5:302014-07-28T00:00:16+5:30
विधानसभेची मोर्चेबांधणी : एकीच्या अभावाने गणित जमेना

जयंतरावांच्या विरोधात युवक नेत्यांची कसरत
अशोक पाटील - इस्लामपूर , ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विधानसभेची तयारी सुरू केली असतानाच, त्यांना शह देण्यासाठी विरोधी गटातील तिसऱ्या फळीतील युवक नेते एकत्रित येऊन मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करणार आहेत. परंतु या युवकांच्यातच अंतर्गत कलह असल्यामुळे त्यांना विधानसभेच्या लढतीसाठी कसरत करावी लागणार आहे.
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीच्या विरोधात नानासाहेब महाडिक आणि वैभव नायकवडी यांचे गटप्रमुख मानले जातात. वैभव नायकवडी आणि नानासाहेब महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली असली, तरी त्यांच्याच घरातील राहुल महाडिक, सम्राट महाडिक, गौरव नायकवडी यांनी जयंतरावांविरोधात युवकांची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोडून राजू शेट्टींच्या हातात हात घालत जयंत पाटील यांना टार्गेट करणारे अभिजित पाटील हे शेट्टींचे प्रचारक म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करणारे बी. जी. पाटील, सयाजी मोरे हे मात्र पडद्याआड गेले. या सर्वांना सल्ला देणारे नजीर वलांडकर यांना मात्र राजकारण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण? असा यक्ष प्रश्न आघाडी काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. आता मात्र विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे बहुतांशी युवक जयंत पाटील यांच्यावर नाराज आहेत. त्याचाच फायदा विरोधी गटातील युवकांनी घेण्याचे तंत्र अवलंबले आहे. परंतु त्यांना त्यांच्याच घरातील ज्येष्ठांची साथ मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यातच वाळवा तालुक्यातील काँग्रेसची धुरा सांभाळणारे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील हे नेहमीच आपल्या वेगळ्या चुली मांडून काँग्रेस चालवायची भाषा करत असतात, तर इस्लामपुरातील माजी नगरसेवक वैभव पवार दादा घराण्याची निष्ठा सांगत जयंत पाटील यांना टार्गेट करतात, तर भाजप व शिवसेना यांची देश व राज्य पातळीवर युती असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये सख्य नाही. भाजपचे विक्रमभाऊ पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यातही मतभेद आहेत.
या सर्व युवा नेत्यांचा जयंत पाटील यांना विरोध असला, तरी त्यांच्यामध्ये एकी नसल्याने आगामी विधानसभेला राष्ट्रवादी नेते त्यांचा ‘कार्यक्रम’ करतील, अशी चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी युवकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.