युवतींनी चोरट्यास बदडले
By Admin | Updated: September 7, 2014 00:26 IST2014-09-07T00:20:51+5:302014-09-07T00:26:08+5:30
बहादूरवाडीच्या मुली : सोन्याची चेन पळवणारा जेरबंद

युवतींनी चोरट्यास बदडले
इस्लामपूर : बहादूरवाडी (ता. वाळवा) येथील पाच महाविद्यालयीन युवतींनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भर वर्दळीच्या रस्त्यावर सोन्याची चेन हिसडा मारून पळवणाऱ्या चोरट्यास पाठलाग करून नागरिकांच्या सहाय्याने पकडले. त्यानंतर दुर्गेचा अवतार धारण केलेल्या रणरागिणींनी त्या चोरट्यास चोप दिल्याची घटना घडली. शहरात धूम स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने लुबाडणारे चोरटे पोलिसांना सापडत नसले, तरी बहादूरवाडीच्या ‘बहाद्दूर’ पोरींनी हे काम करताना आपल्या मनगटातील ‘रग’ दाखविली.
सारिका वसंत खोत (रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) या महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन या चोरट्याने पळवण्याचा प्रयत्न केला. अनिल संभाजी शिंदे (वय ३९, रा. गणपती पेठ, कऱ्हाड) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सारिका खोत ही मैत्रिणी सुप्रिया सुहास खोत, आरती संपत देसावळे, कोमल नागनाथ चन्ने व सुरेखा दत्तात्रय खोत (रा. सर्व बहादूरवाडी) यांच्यासमवेत सकाळी साहेअकराच्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी बसस्थानकावर उतरल्या.
या घटनेवेळी सारिका ही दोन मैत्रिणींसमवेत पुढे होती, तर अन्य दोघी पाठीमागून येत होत्या. या प्रकारानंतर मुलींनी आरडा-ओरडा केल्यावर चोरट्याने हुतात्मा बॅँकेच्या शेजारील बोळातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मुलींचा पाठलाग व दंगा ऐकून तेथील सोमनाथ फल्ले व त्यांच्या साथीदारांनीही त्याचा पाठलाग केला. बोळातून पुढे जाण्याचा मार्ग बंद असल्याने चोरटा एका इमारतीवरून उडी मारून पुन्हा रस्त्यावर आला. तेथे त्याला जेरबंद करून या मुलींनी अक्षरश: लाथा-बुक्कयांनी व चपलाने मारहाण करीत बदडले. नागरिकांनीही त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर सारिका खोत हिने पोलिसात वर्दी दिली. (वार्ताहर)