योगेश वाठारकरला पाच दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:13+5:302021-07-09T04:18:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : मृत महिला रुग्णावर उपचार करून बिल उकळणाऱ्या आधार हेल्थ केअर सेंटरचा सर्वेसर्वा डॉ. योगेश ...

योगेश वाठारकरला पाच दिवस पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मृत महिला रुग्णावर उपचार करून बिल उकळणाऱ्या आधार हेल्थ केअर सेंटरचा सर्वेसर्वा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला गुरुवारी येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कासेगाव (ता. वाळवा) येथील सलीम हमीद शेख यांनी डॉ. वाठारकरविरूद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. इस्लामपूर नगर पालिकेतून शेख यांनी आई सायरा हमीद शेख (वय ६०) हिच्या मृत्यूच्या दाखला घेतल्यानंतर डॉ. वाठारकरने आई मृत होऊनदेखील तिच्यावर दोन दिवस उपचार कसे केले, याचा माग काढला. पालिकेतील नोंद आणि रुग्णालयातील नोंदवहीतील हेराफेरी लक्षात आल्यानंतर शेख यांनी फिर्याद दिली.
सलीम शेख यांनी सुरुवातीला मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे रितसर तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर अधिष्ठाता कार्यालयाने या घटनेत गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा अभिप्राय दिल्यानंतर शेख यांनी डॉ. वाठारकर याच्याविरूद्ध आईचा मृतदेह दोन दिवस रुग्णालयात ठेवून उपचार केल्याचे दाखवत ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी डॉ. वाठारकर याला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चौकट
डॉ. योगेश वाठारकर याच्याकडून आणखी कोणाची फसवणूक अथवा विश्वासघात झाला असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.
चौकट
पाच तासात ११६ सलाईन!
डॉ. वाठारकर याच्या रुग्णालयातील अनेक कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. एका रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र, सकाळी नऊ वाजता रुग्णालयात आलेल्या डॉ. वाठारकरने रुग्णाची प्रकृती बिघडल्याचे सांगत त्याची रवानगी अतिदक्षता विभागात केली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्याचे निधन झाल्याचे जाहीर केले. मात्र, या पाच तासात रुग्णाला ११६ बाटल्या सलाईन लावल्याचे बिलात नमूद करण्यात आल्याची चर्चा आहे.