World Population Day: सांगली जिल्ह्याची लोकसंख्या १४ वर्षात केवळ चार लाखाने वाढली
By अविनाश कोळी | Updated: July 11, 2025 19:31 IST2025-07-11T19:31:20+5:302025-07-11T19:31:33+5:30
जिल्ह्यातील आधार कार्डधारकांची संख्या ३२ लाख १६ हजारांवर : लोकसंख्येत मिरज तालुका आघाडीवर

World Population Day: सांगली जिल्ह्याची लोकसंख्या १४ वर्षात केवळ चार लाखाने वाढली
अविनाश कोळी
सांगली : देशातील जनगणना चार वर्षांपासून रेंगाळली असली तरी आधार कार्डधारकांच्या संख्येनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येचा व वाढीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी होती. २०२५ मध्ये आधार कार्डधारकांची संख्या तब्बल ३२ लाख १६ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात लोकसंख्येत सुमारे चार लाखाची वाढ झाल्याचे दिसून येते. मागील पन्नास वर्षातील दशकवाढीचा विचार करता ही वाढ काहीअंशी कमी दिसून येत आहे.
देशात २०२१ची जनगणना झाली नाही. तरीही आधार कार्डांच्या संख्येवरून लोकसंख्येचा अंदाज येतो. जन्मलेल्या बाळापासून आता आधार नोंदणी सुरू झाल्याने बहुतांशी प्रमाणात अंदाज खरा ठरू शकतो. जिल्ह्यातील १९७१ ते २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर नागरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही दिसून आले आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील ५४ वर्षात सर्वात कमी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या दशकात नोंदली गेली आहे.
जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या
वर्ष - लोकसंख्या (लाखात)
१९७१ - १५.४०
१९८१ - १८.३४
१९९१ - २२.०९
२००१ - २५.८३
२०११ - २८.२२
दशकानुसार लोकसंख्या वाढ
दशक - वाढलेली लोकसंख्या
१९७१ ते ८१ - २.९४ लाख
१९८१ ते ९१ - ३.७५ लाख
१९९१ ते २००१ - ३.७४ लाख
२००१ ते २०११ - २.३९ लाख
२०११ ते २०२५ - ३.९४ लाख
२०११ ते २०२५ या कालावधीतील वाढीचा आकडा आधार कार्ड संख्येनुसार अंदाजित आहे.
तालुकानिहाय आधार कार्डधारक
मिरज - १०,४६,६९७
वाळवा - ४,५६,६१३
जत - ३,८०,८५४
तासगाव - २,५८,५८९
पलूस - २,१३,४५०
खानापूर - २,१७,९४१
क. महांकाळ - १,७८,६६०
आटपाडी - १,७१,०६३
कडेगाव - १,०७,११९
शिराळा - १,८५,३६३
- १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३९.२१ टक्के
- १८ वर्षांवरील पुरुषांची संख्या ४०.८४ टक्के
- ५ ते १८ वर्षे वयोगटातील संख्या १७.५६
- ५ वर्षांखालील संख्या १.२१
- तृतीयपंथी संख्या ०.९
मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक
तालुकानिहाय आधार कार्डधारकांची संख्या पाहता मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक दिसते. २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनताही मिरजेच्या शहरी भागात तब्बल ४ हजार २१ प्रतिचौरस किलोमीटर नोंदली होती, तर सर्वात कमी घनता जत तालुक्यात १४७ इतकी नोंदली गेली होती.