ठेकेदाराने फसविल्याने मजूर बनले भिकारी
By Admin | Updated: December 19, 2014 00:14 IST2014-12-18T23:39:07+5:302014-12-19T00:14:57+5:30
वासीममधील कुटुंबे : चिमुकल्यांसह स्टेशनचा आसरा

ठेकेदाराने फसविल्याने मजूर बनले भिकारी
बालेचाँद हेरवाडे - पट्टणकोडोली -शेकडो मैल दूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सुकाळी (जि. वासिम) येथील सात जोडप्यांना ठेकेदाराने फसविल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. गावाकडे परतीसाठी पैसेही नाहीत. त्यामुळे मिळणाऱ्या भीकेतून पोट भरत कोल्हापूर रेल्वेस्टेशनमध्ये ते आपल्या लहान मुलांसोबत निवारा करून दिवस घालवित आहेत.
ठेकेदार विठ्ठल शिंदे त्यांच्याच गावानजीकचा. त्याच्याकडे ही जोडपी खुदाई व पाईपलाईन तसेच मिळेल ते काम काही वर्षांपासून करीत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते ठेकेदाराबरोबर कोल्हापुरात आल्यावर ठेकेदार रेल्वे स्टेशनजवळ सोडून पसार झाला. या सर्वांनी शिंदे यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांना आपण फसल्याची जाणीव झाली. मुळातच ठेकेदाराबरोबर आलेल्या मजुरांकडे पैसेही नाहीत. एक दिवस रेल्वे स्टेशनवरच उपाशी घालविला. दुसऱ्या दिवशी सोबत असणारी लहान मुले भुकेने व्याकूळ झाल्याने तसेच जवळ खाण्यासाठी पैसेही नसल्याने या मजुरांनी कामाची शोधाशोधही केली. काम मिळाले नसल्याने मात्र, त्यांना नाईलाजाने भीक मागण्याचा मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे या सर्व मजुरांना काम मिळण्याबरोबरच गावी परतीसाठी मदतीचा हात हवा आहे.
कष्टच करून पोटाची खळगी भरली पाहिजे. मात्र, आम्हाला फसवून कामाच्या बहाण्याने आणून ठेकेदार अनोळखी ठिकाणी सोडून पसार झाला. त्यामुळे काम शोधूनही मिळत नसल्याने शेवटी नाईलाजास्तव भीक मागावी लागत आहे.
- सुभाष म्हादू नवघरे