महिलांनी सभ्यतेची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडू नये
By Admin | Updated: December 26, 2014 00:08 IST2014-12-25T23:16:51+5:302014-12-26T00:08:56+5:30
राणी बंग यांचे मत --थेट संवाद

महिलांनी सभ्यतेची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडू नये
समाजजीवनात कोणताही बदल घडण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. सामाजिक बदल हे सरकारचे कार्य आहे, ही समजूतच मुळात चुकीची आहे. सामाजिक भान ठेवून समाजाशी एकरूप होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकानेच सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे झाले तर आपल्याला भेडसावणारे अनेक प्रश्न सुटण्यास सहाय्य होईल, अशी भूमिका ज्येष्ठ समाजसेविका आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. राणी बंग यांनी मांडली. त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
४अर्भकांचे मृत्यू आणि कुपोषण या विषयाचे गांभीर्य ‘कोवळी पानगळ’ या शोधनिबंधातून आपण मांडले, परंतु सध्या विद्यार्थी मृत्यूला का जवळ करीत आहेत?
- पाल्यांवर पालक अपेक्षांचे अतिरिक्त ओझे लादताना दिसत आहेत. हे कोेठेतरी थांबायला हवे. अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी प्रत्येकाची जी धडपड सुरू आहे ती सामाजिकदृष्ट्या योग्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांना सतत यशाचीच सवय होते. साहजीकच अपयश आले की त्यांना नैराश्य येते आणि त्यांचे खच्चीकरण होते. यातूनच विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे रोखायचे असेल तर, नकार पचविण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यांत निर्माण करावी लागेल. जीवनात यश आणि अपयश या दोन्हींचा सामना करण्याचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे.
४महिलांच्या अत्याचारात देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे ....
- नाही! ही वस्तुस्थिती नाही.पूर्वीपासूनच महिलांवर अत्याचार होत होते. केवळ आता प्रसारमाध्यमांमुळे या घटना आपल्यासमोर येत आहेत. अर्थात यामध्ये केवळ पुरुषांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. काही पुढारलेल्या युवती समाजात कमी कपड्यात वावरताना आपल्याला दिसतात. मेट्रो सिटीमध्ये युवती व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. आम्ही कित्येक उदाहरणे अशी पाहिली आहेत की, काही महिला दोन-दोन वर्षानंतर पुरुषांवर बलात्काराचा आरोप करतात. इतकी वर्षे बलात्कार कसा काय होऊ शकतो? समाजात वावरताना आपण समाजाचा घटक आहोत, हे महिलांनी कधीही विसरुन चालणार नाही.
४अत्याचार रोखण्यासाठी काय केले पाहिजे?
- धर्म ज्याप्रमाणे घरी ठेवावा, त्याप्रमाणे समाजात वावरताना महिलांनी सभ्यतेची लक्ष्मणरेषा कधीही ओलांडता कामा नये. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे. सध्या विभक्त कुटुंब पध्दती असल्याने विद्यार्थिनींना संस्कार करण्याकरिता वडिलधाऱ्या व्यक्तींची कमतरता आहे. महिलांवर कोणी अत्याचार केला, तर समाजाची अत्याचारित महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. तिच्यावर अत्याचार झाला म्हणजे सर्व चूक संंबंधित महिलेचीच आहे, हा समज समाजमनातून हद्दपार केला पाहिजे. महिला कायदेशीरदृष्ट्या सजग झाल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही ‘तारुण्यभान’ कार्यशाळेचे आयोजन करीत असतो. पुरुषांमधली बंडखोर वृत्तीदेखील वाढत आहे. त्याला देखील आवर घालणे गरजेचे आहे. अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर, लहान मुलांवर नातेवाईकांच्या माध्यमातूनच अत्याचार झाल्याचे आपल्याला दिसेल. विद्यार्थिनींना शारीरिक बदलाविषयीदेखील शास्त्रीय माहिती दिली गेली पाहिजे. समाजात जागृती झाली, तर अत्याचाराच्या प्रमाणात निश्चित घट होईल.
४गडचिरोलीमध्ये आपल्या प्रयत्नांनी दारूबंदी यशस्वी झाली; परंतु इतरत्र असा सकारात्मक अनुभव का येत नाही?
- आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करायची असेल, तर सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असते. आजकाल चुकीच्या संकल्पनांचा पगडा कित्येकांच्या मनावर आहे. साहजीकच दारू पिणे हे काहींना आपले सामाजिक स्टेटस् (दर्जा) टिकविण्यासाठी महत्त्वाचे वाटते. तीच बाब इतर व्यसनांच्या बाबतीतही आहे. परंतु दारूमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात. महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराची देखील अपरिमित हानी होते. इतरत्रही महिलांनी संघटितपणे दारूबंदी विरोधात लढा दिला पाहिजे. आज राजकीय नेत्यांचेच दारू निर्मितीचे कारखाने आहेत. समाजातून दारू हद्दपार करायची असेल, तर राजकीय इच्छाशक्तीची देखील गरज आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
४आदिवासी क्षेत्रात कुपोषणाची समस्या अस्तित्वात असली, तरी शहरी भागात ही समस्या आहे का?
- हो! फक्त त्याच्या प्रकारात फरक आहे. सध्या प्रत्येकाचे जीवनमान बदलत चालले आहे. धावपळीच्या काळात खाण्याच्या सवयींमध्ये बदल होत आहे. परंतु आपण जे अन्न ग्रहण करतो त्यापैकी आपल्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे, याकडे कित्येकांचे दुर्लक्ष होते. शहरी भागात गरिबीमुळे कित्येकांना धड खायलाही मिळत नाही, तर खाण्याबाबतही काहींच्या मनात अंधश्रध्दा आहेत. त्या दूर कराव्या लागतील. मातांनाच जर योग्य आहार मिळाला नाही, तर त्यांना होणारी अपत्ये कुपोषितच जन्माला येतील. श्रीमंत वर्गातदेखील दोन प्रकारच्या कुपोषणाचे प्रकार पहावयास मिळतात. अति जाड आणि अति बारीक असे ते प्रकार आहेत. नियमित व्यायाम नसल्यामुळे जाडी वाढत चालली आहे, तर कित्येक महिलांना ‘झिरो फिगर’चा ध्यास लागला आहे. या दोन्हीत आपण आपल्या शरीरावरच अन्याय करीत असतो, हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. प्रत्येकाने आपल्या शरीराकडे लक्ष दिल्यास कुपोषिताची समस्या हद्दपार होईल.
४नरेंद्र रानडे