पलूसमध्ये महिला, विद्यार्थिनींचा मोर्चा
By Admin | Updated: August 1, 2014 00:37 IST2014-07-31T23:48:38+5:302014-08-01T00:37:28+5:30
बलात्कार प्रकरण : कडक कारवाईची मागणी

पलूसमध्ये महिला, विद्यार्थिनींचा मोर्चा
पलूस : शालेय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी स्कूल बस चालक सुरेश रामचंद्र पवार या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणाचा खटला जलदगतीने सुरू व्हावा, या मागण्यांसाठी पलूस येथे आज शालेय विद्यार्थी, महिला संघटना, डॉक्टर यांसह विविध संघटना व सर्व पक्षांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
येळावी (ता. तासगाव) येथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या नऊवर्षीय अल्पवयीन मुलीवर शनिवारी (दि. २६) सुरेश पवार (रा. शिवाजीनगर, पलूस) याने बलात्कार केला होता. तासगाव पोलिसांनी त्यास अटकही केली आहे. या घटनेचा पलूस तालुक्यातून सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पलूस शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा श्रीमती वासंती मेरू, माजी सभापती डॉ. सौ. मीनाक्षी सावंत, अरुण लाड, सुहास पुदाले, अमरसिंह इनामदार, मानसिंग पाटील, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सुरेखा लाड, योगिनी बहेनजी (प्रजापती ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय), पुष्पा मिठारी, सौ. सुरेखाताई इनामदार, पद्मावती दुर्गावळे, स्मिता गोरे, कुमार माळी यांच्याबरोबर कु. प्रियांका पाटील (येळावी), सोनाली कदम व इतर विद्यार्थिनींनी घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नीशा पाटील, डॉ. मुक्ता दिवटे, विठ्ठलराव येसुगडे, विष्णू सिसाळ, नंदकिशोर साळुंखे, भरत इनामदार, विक्रम पाटील, तसेच पलूस तालुका मेडिकल असोसिएशन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, ग्रामपंचायत तालुक्यातील महिला संघटना, शाळांतील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते . (वार्ताहर)