शिराळा : तडवळे ( ता.शिराळा) येथील सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या महिलेचा अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. चप्पल विसरले ते आणण्यासाठी त्या परत शेतात गेल्या आणि वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) घडली. वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांचे पत्रे, कौले उडून गेली आहेत.याबाबत माहिती अशी की, मयत सुनंदा पाटील मोरणा धरणाजवळील शिप्याची नाळ येथे शेतात भांगलन करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या दरम्यान विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी भांगलन करणाऱ्या सुनंदा पाटील यांच्यासह सर्वजण घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. गडबडीत सुनंदा यांचे चप्पल विसरले ते आणण्यासाठी त्या माघारी फिरल्या. यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात तसेच तहसीलदार शामला खोत पाटील यांना कळविले.घटनास्थळी सरपंच प्रियांका पाटील, सचिन पाटील, तलाठी सुनील जावीर, ग्रामसेविका प्रभावती भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. डॉ.अविनाश पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबत मयत सुनंदा यांचा पुतण्या सूरज महादेव पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत सुनंदा पाटील यांच्या पश्यात एक मुलगा आहे. मुलगा सचिन पाटील हा मुंबईत नोकरीस आहे.
Sangli: चप्पल विसरले म्हणून मागे फिरल्या अन् मृत्यू ओढावला; तडवळे येथे वीज पडून महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:55 IST