शिराळ्यात रिक्षाचालकाकडून दोन लाखांचा ऐवज परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:47 IST2019-05-27T14:47:07+5:302019-05-27T14:47:37+5:30
शिराळा येथील रिक्षाचालक व माजी सरपंच गजानन सोनटक्के यांनी रिक्षात विसरलेली नंदा रामदास कांबळे (रा. चाळशी पिशवी, ता शाहूवाडी) यांची पाच तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आदी जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज पर्स परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

शिराळ्यात रिक्षाचालकाकडून दोन लाखांचा ऐवज परत
शिराळा : शिराळा येथील रिक्षाचालक व माजी सरपंच गजानन सोनटक्के यांनी रिक्षात विसरलेली नंदा रामदास कांबळे (रा. चाळशी पिशवी, ता शाहूवाडी) यांची पाच तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आदी जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज पर्स परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
नंदा कांबळे शिराळा येथील नातेवाईकांकडे लग्नासाठी आल्या होत्या. सायंकाळी सात वाजता त्या काही नातेवाईकांसह खरेदी व मुहूर्ताच्या बांगड्या घालण्यासाठी बाह्य वळण रस्ता येथून गुरुवार पेठेत आल्या. सर्व खरेदी व कामे आटोपून गजानन सोनटक्के यांच्या रिक्षात बसल्या. सोनटक्के यांनी त्यांना बाह्य वळण रस्ता येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सोडले.
नंदा कांबळे या गडबडीत आपली पर्स रिक्षात विसरल्या. या पर्समध्ये दोन मंगळसूत्रे, एक नेकलेस, एक अंगठी असे सहा तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम, खरेदी केलेल्या वस्तू असा दोन लाख रुपयांचा ऐवज होता. पर्समधील मोबाईल वाजल्याने सोनटक्के यांनी रिक्षात पाहिल्यानंतर त्यांना कांबळे या पर्स रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. याची माहिती त्यांनी नंदा कांबळे यांना दिली.
यानंतर नंदा कांबळे या नातेवाईकांसोबत सोनटक्के यांच्या घरी आल्या. यावेळी गजानन सोनटक्के, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी ही पर्स कांबळे यांना परत केली. या प्रामाणिकपणाबाबत सोनटक्के यांचे कौतुक होत आहे.