समाधानकारक पावसाने यंदा चिंच ‘गोड’ होणार?

By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T21:53:22+5:302014-11-11T00:05:40+5:30

दुष्काळी भागात चिंचा बहरल्या : उन्हाळी बोनस मिळणार काय? उत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा

Will there be 'sweet' in this year with satisfactory rainfall? | समाधानकारक पावसाने यंदा चिंच ‘गोड’ होणार?

समाधानकारक पावसाने यंदा चिंच ‘गोड’ होणार?

प्रवीण जगताप- लिंगनूर -चवीने आंबट असणारी चिंच यंदा लहान- मोठ्या उत्पादकांना उत्पादन व दराच्या बाबतीत ‘गोड’ धक्का देईल, अशी स्थिती आहे. यंदा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मिरज पूर्व, सीमाभाग, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात चिंचा बहरल्या आहेत. मुळात दुष्काळी भागात विनाखर्च व अत्यल्प रोगाची लागण होणाऱ्या या चिंचेला यंदा पावसाचे पाणी योग्यवेळी मिळाल्याने यंदा चिंचा चांगल्याच बहरल्या आहेत. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येणाऱ्या चिंचा छोट्या-मोठ्या उत्पादकांना चांगला ‘उन्हाळी बोनस’ देतील, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे.
भारतात सर्वत्र आढळणाऱ्या चिंचांची लागवड महाराष्ट्रातही सर्वत्र पाहावयास मिळते. बहुतांश लागवड शेताच्या कडेने, बांधावर, डोंगरउताराच्या जमिनीवर, नदी व ओढ्यांच्या काठावर निसर्गत:ही झालेली पाहावयास मिळते. शासनाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मात्र मागील काही वर्षांपासून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: दुष्काळी टापूत काही धाडसी प्रयोगशील शेतकरी चिंचशेतीही करू लागले आहेत. त्यामुळे लहान व मोठे चिंचेचे उत्पादक या भागात आहेत.
यावर्षी जुलै महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा येतो व त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. त्यामुळे वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यानेच यंदा बऱ्याच झाडांना गतवर्षीपेक्षा चिंचेची लागण अधिक झाली आहे. चिंचा झाडांना लगडल्या असून त्यांचा बहर दिसून येत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यात या चिंचा काढणीच्यावेळी उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहेत. सुमारे ४५ ते ५० रुपये किलो वाळलेल्या चिंचेच्या गरास व टरफलासह चिंचेस २५ रुपयांच्या सरासरीने दर मिळतो. तसेच चिंचोक्यांना १२ ते १५ रुपये किलोला दर मिळतो. यंदा सांगली जिल्ह्यातील चिंच उत्पादकांना ५० ते ७० रुपयांपर्यंत दर्जानुसार दर मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात चिंचेच्या दराचा ‘उन्हाळी बोनस’ मिळणार आहे.

चाबुकस्वारवाडी (ता. मिरज) येथे एका शेतकऱ्याने १२ वर्षांपूर्वी चिंचेची ७०० झाडे लावली असून त्यांचे ते उत्पादन घेत आहेत. किमान १५० वर्षे (७ पिढ्या) उत्पादन, लागवड खर्च एकदाच, कमीत कमी रोग, कमी पाण्यावर, कमी खर्चात, हलक्या माळरानावर शक्य, कमी व्यवस्थापन, कमी मजुरीवर, किमान एकरी ७५ हजारांचे उत्पादन देणाऱ्या या चिंचशेतीची उदासीनता केव्हा दूर होणार? असा प्रश्न आहे.

बहुगुणी चिंच
चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून संबोधण्यात येणाऱ्या चिंचेचा सार, चटणी, कोळ, अर्क, गर, पावडर, पन्हे, सरबत, औषध याकरिता, तर चिंचोक्यांचा स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत वापर होतो. बार्शी व सोलापूर येथे चिंचोक्यांपासून खळ निर्मितीचे कारखाने आहेत. चिंचेच्या १०० ग्रॅम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय- ५.६ टक्के, क जीवनसत्त्व- ३ ग्रॅम, कॅल्शिअम- ०.१७ टक्के इतके प्रमाण असते. विविध विकारांवरही चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे.
इतिहासातील चिंच लागवड
म्हैसूर संस्थानात चिंच लागवडीस प्राधान्य दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. त्यांच्या उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे.

Web Title: Will there be 'sweet' in this year with satisfactory rainfall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.