मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 06:42 IST2025-09-15T06:41:23+5:302025-09-15T06:42:33+5:30

साताऱ्याच्या क्रांतिभूमीत साहित्याचा सन्मान

Will take youth trapped in mobile phones to the court of Saraswati: Vishwas Patil | मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील

मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील

बाबासाहेब परीट

बिळाशी (जि. सांगली) :  सातारा ही राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, थोरले शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज यांची ही भूमी आहे. अशा या क्रांतिभूमीत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण?

मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावचा. माझे आजोळ शिराळा तालुक्यातील बिळाशी. वडील शेतकरी कामगार पक्षाचे डाव्या विचारसरणीचे नेते होते. संयुक्त महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. वारणा खोऱ्यात, अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने अजरामर झालेल्या भूमीत माझे बालपण गेले.

प्रश्न : लेखनाची सुरुवात कुठे आणि कशी झाली?

१९७५ मध्ये पुण्यातील वासंतिक कथा स्पर्धेत माझ्या ‘कायदा’ कथेला तिसरा क्रमांक मिळाला. त्याचे परीक्षक श्री. द. जोशी होते. त्याच वेळी ‘आंबी’ ही कादंबरी नवलेखक अनुदानातून प्रकाशित झाली. कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत विद्यालयात अकरावीत असताना साहित्याची गोडी लागली. वारणेच्या मुशीतच माझ्या लेखनाचा पाया रचला गेला.

प्रश्न : शिक्षण आणि साहित्याची जडणघडण?

प्राथमिक शिक्षण नेर्लेत, तर नववीसाठी पाचगणीच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये गेलो. तिथे एका वर्षात २३४ पुस्तके वाचली. अकरावी-बारावी कोकरूडला, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. बिळाशीच्या भैरवनाथ नाट्य मंडळाच्या ऐतिहासिक नाटकांनी माझ्या साहित्यिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. तिथल्या ‘जाग मराठ्या जाग’, ‘देशद्रोही’ यांसारख्या नाटकांनी शिवाजी-संभाजींचे विचार मनात रुजवले.

प्रश्न : लोकनाट्याचा लेखनावर प्रभाव?

गावोगावच्या जत्रांमधील विठाबाई भाऊ मांग, दत्ता महाडिक यांच्या तमाशातील  वगनाट्यांना साहित्यिक मूल्य होते. ऐतिहासिक-सामाजिक विषय, पारंपरिक गाणी यांनी माझ्या लेखनाला समृद्ध केले.

प्रश्न : साहित्य अकादमी पुरस्कार आणि अध्यक्षपदाचा सन्मान?

वयाच्या ३२व्या वर्षी ‘झाडाझडती’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, ही भारतातील क्वचित घटना. साताऱ्यातील धरणग्रस्तांच्या दुःखातून ती कादंबरी आकारली. लेखन हा माझ्या श्वासाचा भाग आहे. नुकतीच ‘ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी प्रकाशित झाली आणि शिवरायांवरील ‘आसमान भरारी’ लवकर येत आहे.

प्रश्न : साहित्य संमेलनातून मराठीसाठी काय करणार?

तरुण पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्यांना पुस्तकांच्या विश्वात आणण्यासाठी गावोगावी वाचन चळवळ समृद्ध करणार. मराठी साहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्रश्न : महाविद्यालयीन शिक्षण आणि लेखनाची जडणघडण पुढे कशी झाली?

माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे बी. यू. पवार, प्राचार्य कणबरकर आणि शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख कन्नड लेखक शांतिनाथ देसाई यांच्यासह बॅ. पी. जी. पाटील, ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर, शंकर सारडा यांचे मार्गदर्शन मिळाले. स्त्री जीवनावरची आंबी कादंबरी, त्यानंतर क्रांतिसूर्य ही नाना पाटील यांच्या जीवनावरील कादंबरी, कलाल चौक कथासंग्रह, १९८८ मध्ये पानिपत, १९८९ मध्ये पांगिरा आणि ९० मध्ये झाडाझडती आली.

Web Title: Will take youth trapped in mobile phones to the court of Saraswati: Vishwas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.