विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाही - विश्वजीत कदम

By अशोक डोंबाळे | Published: June 15, 2024 04:08 PM2024-06-15T16:08:37+5:302024-06-15T16:11:40+5:30

विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यात काँग्रेस चार ते पाच जागा लढवणार असून, लोकांच्या जोरावर त्या निवडून आणणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Will not dare to throw stones in assembly elections says Vishwajit Kadam | विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाही - विश्वजीत कदम

विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाही - विश्वजीत कदम

सांगली : मी आणि विशाल पाटील यांनी धाडसाने लोकसभा निवडणूक लढविली; पण आमच्या या मार्गात बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. ते आता विधानसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे धाडस करणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला; तसेच विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यात काँग्रेस चार ते पाच जागा लढवणार असून, लोकांच्या जोरावर त्या निवडून आणणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांगली लोकसभेचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार मदनभाऊ युवा मंचतर्फे शुक्रवारी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, डॉ. मोनिका कदम, माजी महापौर किशोर जामदार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, सुरेश आवटी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने जिल्ह्याचे आणि काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले. म्हणूनच गटबाजी बाजूला ठेवून काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकत्रित केले. जुना कटुपणा बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. आता एकसंधपणे, एकदिलाने समाजकारण, राजकारण करायचे आहे. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची मूठ बांधलेले काहींना बघवले नाही; पण त्याची आम्हाला तमा नाही. ज्यांनी मार्गात बाहेरून खडे टाकले, त्यांना लोकसभेला जागा दाखवून दिली आहे. आता ते विधानसभेला धाडस करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काहींनी भाषणे, वक्तव्ये केली. त्याला चोख उत्तर द्यायचे आहेत. अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू, पुढची पावले कशी टाकायची हे ठरवू. आता बांधलेली एकीची मूठ सोडायची नाही. वसंतदादा, मदनभाऊ, डॉ. पतंगराव कदम यांच्या विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळवून दिली जाईल. सांगलीतून लोकसभेला एक खासदार दिल्लीला पाठवला. आता सांगलीतून विधिमंडळात दोन आमदार पाठवू. ती जबाबदारी माझी असेल; मात्र विनाकारण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणाकडून होऊ नये.

राज्यातील १५८ मतदारसंघांत आघाडी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल पाहता विधानसभेच्या २८८ पैकी १५८ मतदारसंघांत महाविकास आघाडी आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येणारे सरकार हे सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे असणार आहे, असा विश्वासही डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

माझ्यावर अन्याय तरीही पक्षाशी एकनिष्ठ

खासदार विशाल पाटील म्हणाले, लोकसभेचा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. काँग्रेस विचाराचा खासदार सर्वांनी निवडून दिला. गेली दोन-तीन वर्षे काँग्रेस एक कुटुंब म्हणून सर्वांना एकत्र करण्याचे काम डॉ. विश्वजित कदम यांनी केले. जात, धर्म न पाहता वसंतदादा, पतंगराव कदम यांच्या विचारांचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळेच हा विजय सुकर झाला. माझ्यावर अन्याय झाला; पण मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलो.

जनतेसाठी अहोरात्र काम करणार : विशाल पाटील

विशाल पाटील म्हणाले, मला कष्ट, काम करावे लागेल. विमानतळाचा मुद्दा, पाणी प्रश्न, मराठा आणि धनगर आरक्षण प्रभावीपणे मांडणार आहे. जी व्यक्ती अपक्ष का असेना, मला खासदार करू शकते, ती राज्याचे नेतृत्व करू शकते. जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले. आता जनतेला पाहिजे तसे काम करण्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे.

Web Title: Will not dare to throw stones in assembly elections says Vishwajit Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.