शासनाला आता तरी जाग येणार का?

By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-27T23:24:55+5:302015-04-28T00:31:06+5:30

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या : ठोस उपाययोजनांची आवश्यकता

Will the government still wake up? | शासनाला आता तरी जाग येणार का?

शासनाला आता तरी जाग येणार का?

तासगाव : डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील द्राक्षबागायतदार शेतकरी बजरंग झांबरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या विचार करायला लावणारी आहे. सातत्याने शेतीचे नुकसान होत असताना, शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याची मलमपट्टी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता झांबरेंच्या आत्महत्येने तरी शासनाचे डोेळे उघडणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षाबागांच्या जोरावर तासगावची ओळख सधन तालुका म्हणून झाली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल द्राक्षपिकाकडेच राहिला आहे. इथला शेतकरी सधन आहे असे म्हटले जात असले तरी, दहा-बारा वर्षातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि अलीकडच्या तीन-चार वर्षातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. एकीकडे कर्ज आणि दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे नियोजन केवळ कागदावरच राहिले. त्यामुळेच तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव साधन असलेली शेतीच वर्षानुवर्षे नुकसानीत चालली आहे. अशा परिस्थितीने खचून गेल्यामुळेच झांबरेंसारख्या शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.
दुष्काळ असो वा अवकाळीने झालेले नुकसान, शासनाकडून केवळ पंचानाम्यांचा कागदोपत्री फार्स करून तुटपुंजी मदत शेतकऱ्याच्या झोळीत टाकण्याचा सोपस्कार वर्षानुवर्षे चालत आला आहे. अगदी आघाडी सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरही हाच प्रकार सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना करण्याची तसदी सरकारी यंत्रणा घेताना दिसून येत नाही.
सलग तीन वर्षे अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागेवर शेडनेट टाकून नुकसान टाळण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा नवीन प्रयोगाची अंमलबजावणी शासकीय योजनेच्या माध्यमातून केल्यास, त्यासाठी अनुदान उपलध करुन दिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मात्र हे करण्यासाठी शासनाचे डोळे उघडणार कोण? असाच प्रश्न आहे.
बजरंग झांबरेंनी आत्महत्या केली. आमदार, खासदार, मंत्री येतील; सांत्वन करुन जातील. प्रशासनाकडून तुटपुंज्या मदतीचा फार्स केला जाईल. यापेक्षा वेगळे काही साध्य होईल, अशी अपेक्षा कोणालाच नाही. पण शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरुपी व ठोस अशा उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही, तर सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहील. (वार्ताहर)

मदत वेळेवर मिळणे गरजेचे
राज्यासह देशाच्या बाजारपेठेत तासगावची द्राक्षे आणि बेदाण्याचा मोठा नावलौकिक आहे. द्राक्षबाग उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्यायच राहात नाही. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने अतोनात कष्ट व खर्च घेऊन जगविलेल्या द्राक्षबागा वादळी पावसात डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहिल्यावर शेतकरी खचून जातो. त्याचवेळी सरकारी पातळीवरील अनास्था त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडते. त्यामुळे शासकीय मदत वेळेवर मिळणे गरजेचे आहे.

Web Title: Will the government still wake up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.