आष्टा-मर्दवाडी निचरा कालव्याचे काम पूर्ण होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:34+5:302021-05-05T04:42:34+5:30
सुरेंद्र शिराळकर आष्टा : आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील क्षारपड जमिनी सुपीक व्हाव्यात, या दृष्टिकोनातून माजी आमदार स्व. विलासराव ...

आष्टा-मर्दवाडी निचरा कालव्याचे काम पूर्ण होणार का?
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील क्षारपड जमिनी सुपीक व्हाव्यात, या दृष्टिकोनातून माजी आमदार स्व. विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून या परिसरातील जमिनीतून चर खोदून येथील पाणी कृष्णा नदीला सोडण्यात आले. परंतु आष्टा, अंकलखोप, गारपीर रस्त्याच्या पूर्व बाजूच्या काही शेतकऱ्यांनी अडवणूक केल्याने पाणी पुढे जाणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या निचरा कालव्याचे काम कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी परिसरात हजारो एकर जमिनी अतिपाण्यामुळे क्षारपड झाल्या आहेत. या जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी विलासराव शिंदे व जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेळोवेळी जेसीबी देऊन चर खुदाई करण्यात आली. मागील चार वर्षापासून मंत्री जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, संचालक विराज शिंदे, श्रीकांत कबाडे, माणिक शेळके, युवक नेते प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील यांच्या सहकार्यामुळे चर खुदाईचे काम मार्गी लागले आहे. आष्टा येथील जगन्नाथ बसुगडे, राजू देसावळे, नंदकुमार बसुगडे, पांडुरंग बसुगडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कारंदवाडी, आष्टा व मर्दवाडी परिसरातील हजारो एकर जमिनीचा पोत सुधारून या जमिनीमध्ये ऊस, केळी, हळद, भाजीपाला पिकांचे उच्चांकी उत्पादन मिळत आहे.
आष्टा, कारंदवाडी परिसरातील पाणी मर्दवाडीपर्यंत आले आहे. २२ फूट रुंद व १२ ते १३ फूट खोल निचरा कालवा नदीकडे गेला आहे. त्यामुळे या जमिनी सुधारत आहेत.
मात्र बसुगडे मळा परिसराकडून मर्दवाडी, कृष्णा नदीकडे जाणाऱ्या निचरा कालव्यास काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. जयंत पाटील यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होऊ नयेत यासाठी मोठे पाइप टाकून पाणी पुढे नेण्यास मान्यता देण्यात आली.
मात्र ते काम वर्षापासून बंद आहे. मेअखेर हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. जयंत पाटील यांनी तातडीने मार्ग काढून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
फोटो : ०३ आष्टा २
ओळ : आष्टा-मर्दवाडी येथील इनामदार मळ्यानजीक निचरा कालव्याचे काम थांबले आहे.